दौंड तालुक्यातील भैरवनाथ विद्यालयाचे शिक्षक विनायक कांबळे व त्यांचे कुटुंब त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आमरण उपोषणास बसले आहेत.
दौंड, ता.२९ : दौंड तालुक्यातील खुटबाव येथिल भैरवनाथ विद्यालयाचे शिक्षक विनायक कांबळे आणि त्यांचे कुटुंबीयांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी २४ जानेवारी पासून विद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
तत्कालीन मुख्याध्यापक जाधव एच. के. यांनी भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या काही संस्थाचालकांच्या सांगण्यावरून कांबळे यांच्या सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या सेवा पुस्तकात(सर्व्हिस बुक) खाडाखोड केली आहे. कांबळे यांनी त्यांच्या शिल्लक असणाऱ्या अर्जित रजा वापरल्या नसताना त्या रजा वापरल्या आहेत अशी नोंद सेवा पुस्तकावर केली या कारणामुळे कांबळे यांनी तत्कालीन शिक्षणाधिकारी श्रीमती वाखरे यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या परंतु त्या तक्रारीला तत्कालीन शिक्षण अधिकारी यांनी संस्थेशी हात मिळवणी करून कोणतीही दाद दिली नव्हती.
त्यामुळे कांबळे यांनी गेली तीन वर्ष राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी तत्कालीन शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, राजेंद्र अहिरे आणि विद्यमान उपसंचालक हारून अत्तार यांच्याकडे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा सतत पाठपुरावा केलेला होता.

तसेच कांबळे यांनी दि.२२ मे २०२३ ते दि.९ जून २०२३ रोजी शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्या कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषण केलेले होते. शिक्षण विभागाच्या सर्व वरिष्ठ कार्यालयांनी तत्कालीन मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकारी यांच्या चौकशीचे अनेक वेळा आदेश दिले परंतु माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर कोणतीही माहिती शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक शिक्षण आयुक्त यांना सादर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे दिनांक २१ जानेवारी रोजी कांबळे हे पुन्हा शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ करणार होते याची दखल घेऊन पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान शिक्षण अधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांनी कांबळे यांच्या सह संस्थांचालक यांची दिनांक २२ जानेवारी रोजी त्यांच्या कार्यालयात बैठक बोलावली होती.
शिक्षणाधिकारी डॉ.कारेकर यांनी झालेल्या बैठकीत कांबळे यांनी गेले तीन वर्षे उपस्थित केलेल्या मुद्द्यानुसार भैरवनाथ शिक्षण मंडळाने सविस्तर माहिती द्यावी तरच गेले दोन महिने भैरवनाथ विद्यालय खुटबाव, राजेश्वर विद्यालय राजेगाव, शारदा विद्यालय सहजपूर येथील शिक्षक कर्मचाऱ्यांचा बंद असलेला पगार वस्तू स्थितीदर्शक कागदपत्राच्या आधारे सह्यांचे अधिकार तात्पुरते दिले जातील असे सांगितले होते.
याचाच राग मनात धरून संस्थेचे खजिनदार अरुण थोरात आणि लेखनिक काम पाहणारे सतीश अवचट यांच्या सांगण्यावरून सह्यांचेही अधिकार नसलेले परंतु संस्थेने प्रभारी नेमलेले मुख्याध्यापक जगताप आर.एम.यांनी कांबळे यांना हजेरी पुस्तकावर सह्या करण्यास मज्जाव केला तसेच शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र पुणे येथे बैठकीला उपस्थित रहा असे असताना कांबळे हे विनापरवानगी गैरहजर राहिले असं कारण देत सह्या बंद केल्या शिवाय पायात शूज घालून आत मध्ये यायचं नाही असेही फर्मावलं याच कारणाने कांबळे यांच्या कुटुंबीयांनी दिनांक २४ जानेवारी पासून भैरवनाथ विद्यालयाच्या गेटवर सहकुटुंब आमरण उपोषणास प्रारंभ केला असून शिक्षक कांबळे यांनी सुद्धा २८ जानेवारीपासून उपोषणास बसण्याचे ठरवले आहे. आजचा उपोषणाचा ६ दिवस असून, कांबळे यांनी सांगितले की, दि.३० रोजी पूर्ण कुटुंबासहित याठिकाणी आम्ही सर्वजण आत्मदहन करणार आहोत असा इशारा यावेळी दिला आहे.