भामरागड तालुक्यातील घटना
दोघांवर गुन्हा दाखल.
अहेरी :-भामरागड तालुक्यातील घटना पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने काठीने प्रहार केला तेव्हा पती जागीच ठार झाल्याची घटना भामरागड तालुक्यातील दोबुर गावात घडली
भामरागड तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर गटग्रामपंचायत मिरगुळवंचा अंतर्गत येत असलेल्या दोबूर या गावाचा समावेश आहे. दोबूर येथील प्रीतम बहादूर एक्का वय ५० वर्षे याला त्याची पत्नी मानती प्रीतम एक्का वय ४० व मुलगा जोसेफ प्रीतम एक्का वय २२ यांनी काठीने मारहाण केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रीतम एक्का हा नेहमी मद्यप्राशन करून कुटुंबीयांना त्रास द्यायचा. शारीरिक छळ करायचा. याबाबत २०२२ साली त्याचावर दोन गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, १७ मार्च रोजी सकाळी मृतक प्रीतम हा स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणण्यासाठी आरेवाडा येथे गेला होता. त्यानंतर दुपारी तो १२ वाजेच्या सुमारास मद्यप्राशन करून घरी परतला. यावेळी त्याची पत्नी घरी जेवायला बसली होती. दरम्यान, घरात धिंगाणा घालून तो पत्नीला मारायला गेला. त्यामुळे चिडून जाऊन पत्नीने लाकडाने त्याच्यावर वार केला. नंतर मुलानेही वार केला. यात प्रीतमचा मृत्यू झाला. सध्या तेंदू हंगामाच्या बेलकटाईचे काम सुरू असल्याने गावातील बहुतांश नागरिक बेलकटाईकरिता जंगलात गेले होते. त्यामुळे प्रीतमची आई मानकुवारी बहादूर एक्का (६५) ही शेतात बेलकटाईला गेली होती. ती घरी परतल्यावर हा प्रकार तिच्या लक्षात आला. तोपर्यंत प्रीतमची जीवनयात्रा संपली होती. यासंदर्भात मंगळवार, १८ मार्च रोजी सकाळी भामरागड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर प्रीतमची पत्नी व मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास भामरागडचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.
शंकर मुत्येलवार/ एन टीव्ही न्यूज अहेरी गडचिरोली