रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मानवाधिकार संघटनेची मागणी

GADCHIROLI | गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका व राजकीय केंद्र स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ३० हजारांपेक्षाही जास्त लोकसंख्या असणाऱ्या चामोर्शी नगरपंचायतीत एका जर्जर रुग्णवाहिकेने आरोग्यसेवा देण्यात येत आहे. येथे चांगल्या दर्जाची रुग्णवाहिका नसल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

चामोर्शीसारख्या मोठ्या शहरात लोकसंख्येनुसार आवश्यक रुग्णवाहिकांची सोय नसल्याने सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांची खूप मोठी फरफट होत आहे. त्यामुळे चामोर्शी शहरात अनेकदा रुग्ण तडफडत असतात. परंतु रुग्णाच्या नातेवाइकांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. सर्व रुग्ण हे खासगी वाहनाने नेणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील नगरपंचायत प्रशासनसुद्धा या विषयाकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. एकीकडे नगरपंचायत कोट्यवधी रुपयांची विकासकामे करत आहे परंतु नगरपंचायतीद्वारे आवश्यक रुग्णवाहिका सेवा देण्यासाठी कोणत्या प्रकारची उपाययोजना करीत नाही, हा विषय गंभीर आहे. या विषयाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोलीद्वारे खासदार डॉ. नामदेव किरसान यांना भ्रमणध्वनीवर माहिती देण्यात आली. त्यांनी मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना सकारात्मक उत्तर देत नगरपंचायत चामोर्शी येथे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले, राज्य सरकारने नगरपंचायत चामोर्शी येथे तत्काळ रुग्णवाहीका उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेशध्यक्ष डॉ, प्रणय खुणे, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केली आहे.

भास्कर फरकडे

प्रतिनिधी, एन टिव्ही न्युज मराठी

गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *