अहिल्यानगर :
अहिल्यानगर जिल्ह्यातील मेहेकरी फाटा येथील संजीवनी मेडिकल ट्रेनिंग सेंटर संचलित श्री वीरभद्र प्राथमिक आश्रमशाळेत आज शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. भटके विमुक्त जाती-जमाती, अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी घटकातील गोरगरीब, निवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या या शाळेला दानशूर व्यक्तींच्या मदतीमुळे मोठा आधार मिळत आहे.
या कार्यक्रमात शैक्षणिक साहित्याचे वाटप मेहेकरी गावचे युवा उद्योजक आणि विद्यमान सरपंच मा. श्री. नंदूशेठ पालवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवनाथ सानप (कॉन्ट्रॅक्टर), विठ्ठल पालवे (माजी चेअरमन), रवींद्र पालवे (माजी ग्रामपंचायत सदस्य), प्रशांत पालवे, किरण काळे, विकास फुलशेठे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद फुंदे आणि सचिव डॉ. भगवान वाघ यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षक नागरे सर यांनी केले, तर शाळेविषयी सविस्तर माहिती मुख्याध्यापक शिंदे सर यांनी दिली. यावेळी सरपंच नंदूशेठ पालवे यांनी विद्यार्थ्यांसाठी ५० जेवणाच्या ताटांचे योगदान दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यकाळातही शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. मिलिंद फुंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “शाळेमध्ये गरीब, वंचित मुलं शिक्षण घेत असून, त्यांना भौतिक सुविधा मिळण्यासाठी दानशूर व्यक्तींचे सहकार्य आवश्यक आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करावा.”
यावेळी गावचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच नंदूशेठ पालवे यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक करत, “शाळेने थोड्याच कालावधीत घेतलेली भरारी निश्चितच प्रेरणादायी आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेसाठी आवश्यक ती मदत केली जाईल,” असे आश्वासन दिले. माजी चेअरमन विठ्ठल पालवे यांनी शाळेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव डॉ. भगवान वाघ यांनी देखील मनोगत व्यक्त करताना, “शाळेतील मुलांना कोणत्याही प्रकारच्या सुविधांची कमतरता भासू देणार नाही,” असे ठाम मत मांडले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना वही, पेन, कंपास, चित्रकलावही, रंग पेटी, पेन्सिल, खोडरबर, पाटी, पट्टी, दुरेघी वही, चाररेघी वही यांसारखे विविध शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी दहिफळे सर, गिते मॅडम, जाधव सर, आंधळे सर, गिते सर आदी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गर्जे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अधीक्षक डोळे सर यांनी केले.
प्रतिनिधी नंदु परदेशी,
एनटीव्ही न्यूज मराठी, जामखेड (अहिल्यानगर).