गोंदिया: गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गोंदिया-बालाघाट रोडवरील मुरपार गावाजवळ रात्री नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीदरम्यान, सुमारे साडेआठ वाजता एका तरुणाच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रशांत केशव सोनवणे (वय १८, रा. कोपरगाव, जिल्हा अहमदनगर) असे सांगितले.
त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता पोलिसांना धक्काच बसला. बॅगेत दोन गावठी पिस्तूल आणि १० जीवंत काडतूस आढळून आले. जप्त केलेल्या या शस्त्रांची एकूण किंमत सुमारे एक लाख पाच हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गंभीर प्रकरणी आरोपी प्रशांत सोनवणे याच्या विरोधात रावणवाडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रावणवाडी पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी राधाकिसन चुटे,
एनटीव्ही न्यूज मराठी, गोंदिया.