- निवडणुकीपूर्वी शहरात हाय-व्होल्टेज ड्रामा; महेश निमोणकर यांचा ‘घनशक्ती विरुद्ध जनशक्ती’चा इशारा

जामखेड प्रतिनिधी (दि. १ डिसेंबर)
अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना शहरातील राजकीय वातावरण हाय-व्होल्टेज झाले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या लढतीत, रविवारी (३० नोव्हेंबर) रात्री प्रभाग १२ मधील चुंभळी परिसरात पैसे वाटप करणाऱ्या संशयित गाडीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीचे मोठे नुकसान झाले असून, या प्रकारामुळे जामखेड शहरात खळबळ उडाली आहे.
पैसे वाटपाचा प्रकार उघड
प्रभाग १२ मधील चुंभळी परिसरात पैसे वाटप सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी संशयित गाडीचा पाठलाग केला. कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत गाडीचे मोठे नुकसान झाले.
नेत्यांची मांदियाळी आणि राजकीय आरोप
जामखेडमध्ये सध्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी तळ ठोकला आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार गल्लोगल्ली प्रचार करत आहेत. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे स्टार प्रचारक आमदार सुनील शेळके यांच्या सभा पार पडल्या आहेत. आज, १ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आणि संध्याकाळी आमदार रोहित पवार यांचीही सभा होणार आहे.
‘दोघांच्या जिरवाजिरवीत जामखेड दुर्लक्षित’
गाडीवरील दगडफेकीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
- दोन नेत्यांवर टीका: “जामखेडमध्ये दोन मोठे नेते असूनही शहर विकासाऐवजी दोघेही एकमेकांची जिरवाजिरवी करण्यात व्यस्त आहेत. रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. सर्वत्र अस्वच्छता, उडणारी धूळ आणि आठ दिवसांनी मिळणारे पिण्याचे पाणी या सगळ्यासाठी हे दोन्ही नेते जबाबदार आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
- ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’: “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी बनली आहे. आज पैसे वाटणारे उद्या गुंडगिरी करणार. त्यातून विकास कधीच होणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
- प्रशासनाला मागणी: शहरात अनेक नवीन गाड्या येत असल्याने त्यांची तपासणी करण्याची मागणी निमोणकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
- आश्वासन: जामखेड आजही मूलभूत सुविधा नसलेले शहर आहे. नागरिकांनी सत्ता दिल्यास अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरचा कायापालट करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रतिनिधी नंदु परदेशी,
एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.
