७० वर्षीय मुख्य आरोपीकडून तब्बल १४ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली.
चोरीचा माल विकत घेणारे इतर ४ आरोपीही जेरबंद.
सन २०२४ पासून दाखल असलेल्या गुन्ह्यांची पाथर्डी पोलिसांनी केली उकल.
AHILYANAGAR | पाथर्डी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शहरात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची मालिका अखेर उघडकीस आणण्यात आली आहे. एका ७० वर्षीय मुख्य आरोपीसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल १४ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे, ज्यामुळे पाथर्डी शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.
गु. र. न. १३३३/२०२५ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना, पोलिसांनी बाळू किशोर कुऱ्हे (वय ७० वर्षे) याला ताब्यात घेतले. बाळू कुऱ्हे हा मूळचा रंगारगल्ली, पाथर्डी येथील रहिवासी असून तो सध्या शिरूर, जिल्हा पुणे येथे वास्तव्यास होता. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत त्याने सन २०२४ पासून दाखल असलेल्या १४ घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. एवढेच नव्हे तर, या मुख्य आरोपीकडून चोरीचा माल विकत घेणाऱ्या इतर ४ आरोपींनाही पाथर्डी पोलिसांनी त्वरित अटक केली आहे. या सर्व आरोपींकडून घरफोडी चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी, अहमदनगर.
