
जामखेड प्रतिनिधी, (दि. ९ डिसेंबर)
अहिल्यानगर: जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परतेने आणि माणुसकीच्या भावनेतून एका अपघातग्रस्ताला तातडीने मदत करून त्याचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे ते पुन्हा एकदा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांना ‘माणसातील देव माणूस’ म्हणून जनसामान्यांमध्ये ओळखले जाते.
अपघातस्थळी अवघ्या ५ मिनिटांत दाखल
आज सकाळी साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास, जामखेडपासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सारोळा रोडवर एका मोटरसायकलस्वारास चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला होता.
या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना विनीत गुंदेचा आणि प्रदीप आजबे यांच्यामार्फत मिळताच, त्यांनी जराही वेळ न घालवता केवळ पाच मिनिटांच्या आत आपल्या ॲम्बुलन्ससह घटनास्थळ गाठले.
त्वरित उपचारामुळे मोठी मदत
घटनास्थळावरील परिस्थिती पाहता, अपघातग्रस्त दुचाकीस्वाराचा हात फॅक्चर झाल्याचे कोठारी यांच्या त्वरित लक्षात आले. त्यांनी कोणताही विलंब न करता जखमी अपघातग्रस्तास जामखेड येथील पन्हाळकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
जखमी व्यक्तीचे नाव नितीन मनोहर आजबे (वय ३७, मु.पो. शिराळ, ता. आष्टी, जि. बीड) असे समजले. नितीन आजबे हे जामखेड शहरालगत असणाऱ्या जमदारवाडीवरून जामखेडकडे येत असताना हा अपघात घडला.
लोकांकडून कौतुकाचा वर्षाव
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे केवळ पाच मिनिटात अपघातस्थळी पोहोचल्याने, उपस्थितांनी त्यांचे जोरदार कौतुक केले. “हजारो लोकांचे प्राण वाचवणारे संजय कोठारी हेच खरे देवदूत आहेत,” अशा शब्दांत लोकांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
दरम्यान, या अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी नंदु परदेशी
एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.
