तक्रारीनंतरही दबावतंत्राचा वापर करून निकाल जाहीर केल्याचा अपक्ष उमेदवाराचा आरोप
जामखेड नगरपरिषदेच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रभाग क्रमांक ३ मधील केंद्र क्रमांक २ वर कंट्रोल युनिट नंबर आणि सील पट्टी नंबरमध्ये गंभीर तफावत आढळून आली आहे. याबाबत उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेत तक्रार केली असता, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याची दखल न घेता आणि कोणाचेही म्हणणे ऐकून न घेता निकाल जाहीर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांची ही भूमिका संशयास्पद असून या प्रकरणाची निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अपक्ष उमेदवार सोनाली भोसले यांचे पती पांडुरंग भोसले यांनी केली आहे.
जामखेड नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती.
यावेळी मतदानाच्या शेवटी उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतपेटी सील करताना मतदानाचा हिशोब असलेल्या फॉर्म १७-सी वर कंट्रोल युनिट नंबर आणि सील पट्टी नंबर देण्यात आला होता. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक ३ मधील केंद्र क्रमांक २ ची मशिन्स टेबलावर आली. यावेळी मतमोजणी मशीनवरील कंट्रोल युनिट नंबर आणि सील पट्टी नंबर तपासले असता, त्यात आणि फॉर्म १७-सी वरील नोंदीमध्ये मोठी तफावत आढळून आली. तसेच मशीनवर संबंधित अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसल्याचेही निदर्शनास आले.
या प्रकारामुळे मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ उडाला. कंट्रोल युनिट आणि फॉर्ममधील अनुक्रमांक जुळत नसल्याने उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेत मतमोजणी थांबवण्याची मागणी केली. यावेळी अपक्ष उमेदवार सोनाली पांडुरंग
भोसले यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तत्काळ लेखी तक्रार अर्ज दाखल केला. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी या गंभीर तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. कुणाच्या तरी दबावाला बळी पडून आणि कोणाचेही म्हणणे ऐकून न घेता त्यांनी पुन्हा मतमोजणी सुरू केली आणि घाईघाईने निर्णय जाहीर केला, असा आरोप पांडुरंग भोसले यांनी केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ही कृती संशयास्पद असून मशीनमध्ये घोटाळा केल्याचे यावरून सिद्ध होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वसीम सय्यद, पांडुरंग भोसले आणि ऋषिकेश खरात यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दुसऱ्या फेरीतील प्रभाग क्रमांक ३ च्या मतमोजणी वेळी हा प्रकार घडला. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान संपल्यावर फॉर्म १७-सी दिला जातो, ज्यावर मशीनचे सील नंबर आणि अधिकाऱ्यांच्या सह्या असतात. मात्र, मतमोजणीला आलेले मशीन आणि प्रतिनिधींकडे असलेला फॉर्म १७-सी यांचा कुठेच ताळमेळ लागला नाही. मशीनचा अनुक्रमांक वेगळाच होता आणि त्यावर कोणाचीही सही नव्हती. हा घोटाळा उघड झाल्यानंतर काही काळ मतमोजणी थांबवण्यात आली होती, मात्र अधिकाऱ्यांनी आक्षेपांना वाटाण्याच्या अक्षता लावत प्रक्रिया पूर्ण केली. या गंभीर प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मोनं 9765886124
