• सोमनपल्ली–धाबा रोडवरील इलेक्ट्रीक लोखंडी पोल आणि तारांच्या चोरीचा पर्दाफाश.
  • गॅस कटरचा वापर करून पोल कापणाऱ्या दोन सराईत आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
  • बोलेरो पिकअप, गॅस सिलेंडर आणि कटरसह १० लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त.
  • पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली धाबा पोलिसांची यशस्वी कामगिरी.

CHANDRAPUR | चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनपल्ली–धाबा रोडवर इलेक्ट्रीक लोखंडी पोल व ॲल्युमिनियम तार चोरीचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. चोरट्यांनी गॅस कटरने चक्क डीपी पोल कापून शासनाचे सुमारे २५ हजारांचे नुकसान केले होते, मात्र धाबा पोलिसांनी या टोळीचा छडा लावत दोन आरोपींना जेरबंद केले आहे.

धाबा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे बोलेरो पिकअपसह सापळा रचून तपास केला असता, या चोरीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी या कारवाईत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली बोलेरो पिकअप, गॅस कटर, गॅस सिलेंडर, वायर कटर, मोबाईल आणि चोरीचे साहित्य असा एकूण १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली धाबा पोलिसांनी पार पाडली. या कारवाईमुळे परिसरात वीज साहित्याची चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

प्रतिनिधी, अमान कुरेशी, चंद्रपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *