• वाशिम एलसीबीची मोठी कारवाई; आंतरजिल्हा दुचाकी चोरांच्या टोळीला ठोकल्या बेड्या.
  • साखरडोह येथून तीन संशयित आरोपी ताब्यात; चोरीच्या ४ मोटार सायकली हस्तगत.
  • अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांची दिली कबुली.
  • घरफोडी आणि पानपट्टी फोडून रोख रक्कम लंपास केल्याचेही तपासात उघड.

WASHIM | वाशिम जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांपासून पोलिसांनी राबविलेल्या धडक मोहिमेत आंतरजिल्हा मोटार सायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे.

आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये आतिष भगवान चवरे यांनी त्यांची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दिली होती, त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी पोउपनि शेखर मास्कर आणि अंमलदारांची टीम तयार केली होती. या टीमने गोपनीय माहितीच्या आधारे १२ मे २०२६ रोजी ग्राम साखरडोह येथून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, गुन्ह्यात चोरी गेलेली होन्डा शाईन मोटार सायकल हस्तगत करण्यात आली. तसेच या आरोपींनी अकोला जिल्ह्यातील अकोट फैल आणि दहीहांडा, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी येथूनही मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. इतकेच नव्हे तर, त्यांनी घरफोडी करून दागिने, रोख रक्कम आणि वाशिम शहर पोलीस स्टेशन हद्दीतील लाखाळा परिसरातील पानपट्टी फोडल्याचा गुन्हा देखील मान्य केला आहे. या कारवाईमुळे चोरट्यांच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.


फुलचंद भगत, वाशिम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *