अहिल्यानगरमध्ये रिक्षाचालकाचे अपहरण करून मारहाण करणाऱ्या आणि दोन गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. चेतन संतोष सरोदे या २१ वर्षीय आरोपीला नेवासा तालुक्यातील भानस हिवरा येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
चेतन संतोष सरोदे, रा. गांधीनगर, बोल्हेगाव याने साथीदारांसह २६ जुलै रोजी फिर्यादी फैजान समीर सय्यद यांचे बोल्हेगाव चौकातून बळजबरीने मोटारसायकलवर अपहरण केले. त्यांना एका शेतात नेऊन जुन्या वादातून लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात BNSच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल होता.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अमलदार संदीप पवार, विजय ठोंबरे, गणेश धोत्रे, अमृत आढाव, सागर ससाणे, अभिजीत आरकल, विष्णु भागवत आणि शाहिद शेख यांच्या विशेष पथकाने १४ ऑगस्ट रोजी भानस हिवरा येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका गंभीर गुन्ह्यातही तो पाहिजे असल्याचे उघड झाले.
पोलीस अधीक्षक श्री. मुम्माका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीला पुढील कारवाईसाठी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
प्रतिनिधी : रजत दायमा | एनटीव्ही न्यूज मराठी | अहिल्यानगर
