उदगीरमध्ये परिवर्तन सीरत कमिटीच्या वतीने पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवन व शिकवणीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी इजलास-ए-आमचे आयोजन करण्यात आले. भाजी मार्केट, पतेवार चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात हाफिज सय्यद हुजैफा तौहीद खतीब यांच्या पवित्र कुराण पठणाने, तर हाफिज मुदस्सिर नबी शेख यांच्या नात सादरीकरणाने झाली. अध्यक्षस्थानी हजरत मौलाना हाफिज सय्यद जियाउद्दीन मजाहिरी साहेब होते. प्रमुख उपस्थितीत नगरसेवक अहमद सरवर, नगरसेवक सय्यद इमरान पाशा, मौलाना मुजम्मिल खासमी साहब, सनाउल्लाह खान, ओम गांजुरे, अब्रार पठाण आणि A1 हॉटेलचे मालक लईक खान उपस्थित होते.
प्रमुख वक्ते मौलाना अबरारुल हसन रहमानी साहेब, हैदराबाद आणि मौलाना मोईजुद्दीन कासमी साहेब, लातूर यांनी पैगंबरांच्या जीवनातील प्रसंग, मानवतेप्रती करुणा, सामाजिक न्याय, बंधुभाव, शांतता आणि नैतिक मूल्यांवर मार्गदर्शन केले. मौलाना अबरारुल हसन रहमानी यांनी परमेश्वरावरील श्रद्धा जितकी दृढ असेल, तितके आचरण शुद्ध राहते, असे सांगितले. अब्दुल मुजीब देवणीकर यांनीही मराठीतून पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या मानवतेसाठीच्या मार्गदर्शनावर प्रकाश टाकला.
सूत्रसंचालन हाफिज अब्दुल अजीज राजा पटेल यांनी केले. परिवर्तन सीरत कमिटीचे संस्थापक अध्यक्ष अझरोद्दीन शमशोद्दीन शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमिटीचे पदाधिकारी, मौलाना अजीज पटेल, शेख हमीद, कुरेशी उमर, सद्दाम बागवान, अन्सार सिद्दिकी आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
