चामोर्शी शहरात सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रथम आगमनावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. व्यस्त कार्यक्रमामुळे घाईत असतानाही मंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत आपला ताफा थांबवून त्यांच्याशी संवाद साधला.
फटाक्यांची आतषबाजी, पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्वागत करण्यात आले. भाजप तालुकाध्यक्षा रोशनी स्वप्निल वरघंटे यांच्या नेतृत्वाखाली हा स्वागत सोहळा पार पडला. यावेळी रोशनी वरघंटे यांनी मंत्र्यांना राखी बांधली.
यावेळी चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते, रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण तसेच विविध पायाभूत सुविधांच्या प्रश्नांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था आणि रखडलेली विकासकामे याबाबतही मंत्र्यांसमोर प्रश्न मांडण्यात आले.
मंत्र्यांनी कार्यकर्त्यांची आस्थेने विचारपूस करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रश्नांची सकारात्मक दखल घेऊन रखडलेल्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
आता मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना प्रत्यक्षात किती गती मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शंकर मुत्येलवार | एनटीव्ही न्यूज मराठी | गडचिरोली
