यावल शहरालगतच्या खडकाई नदीपात्रात प्रोसोपीस बाभळीच्या झुडपांमध्ये लपवून ठेवलेली सागवान कटाई वनविभागाच्या धडक कारवाईत जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत सागवान कटाईचे सात नग आढळून आले आहेत.

वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:१० वाजता गुप्त बातमीद्वारे खडकाई नदीपात्रातील प्रोसोपीस बाभळीच्या झुडपांमध्ये सागवान कटाई लपवून ठेवलेली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या गस्ती पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचांच्या समक्ष पाहणी केली. यावेळी सागवान कटाईचे ०७ नग, एकूण घनफळ ०.१७२ घनमीटर आणि नुकसान किंमत ३,८३१ रुपये इतकी आढळून आली. पंचांच्या समक्ष पंचनामा करून सदर सागवान कटसाईज जप्त करण्यात आली. जप्त माल शासकीय वाहनाद्वारे मुख्य विक्री केंद्र, यावल येथे ताबा पावतीद्वारे जमा करण्यात आला. याप्रकरणी वनगुन्हा क्र. १९/२०२६, दिनांक ०३/०९/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली असून, आवश्यक पंचनामा व जबाब नोंदविण्यात आले आहेत.

सदर प्रकरणाचा पुढील तपास वनपाल, डोंगरकठोरा तथा तपास अधिकारी यांच्यामार्फत नियमानुसार करण्यात येत आहे. ही कारवाई सौरिष सहाय, उप वनसंरक्षक, यावल वन विभाग जळगाव, राजेंद्र सदगीर, विभागीय वनाधिकारी (दक्षता), धुळे आणि समाधान पाटील, सहाय्यक वनसंरक्षक, यावल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत महेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी गस्ती पथक यावल, संजय पाटील, वनपाल ग.प. यावल, सतीश वाघमारे, वनरक्षक गस्तीपथक यावल, आय.बी. चव्हाण, वनरक्षक गस्ती पथक यावल, एस.आर. तडवी, पोलीस कॉन्स्टेबल ग.प. यावल आणि वाहनचालक शरद पाटील यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *