“कुणी लग्नासाठी मुलगी देता का मुलगी?” असा उद्विग्न सवाल करत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील 28 वर्षीय तरुणाने थेट जिल्हा परिषद कार्यालयाच्या पूनम गेटसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. किसनदेव दत्तात्रेय ननावरे असे या आंदोलक तरुणाचे नाव आहे.
किसनदेव ननावरे यांच्याकडे अर्धा एकर शेती असून ते सध्या बेरोजगार आहेत. शेतकरी आणि बेरोजगार असल्याने लग्न जमत नसल्याची व्यथा त्यांनी मांडली आहे. आजच्या बहुतांश मुली आणि त्यांचे पालक उच्चशिक्षित, सरकारी नोकरदार किंवा चांगल्या पगाराची नोकरी असलेल्या वरालाच पसंती देत आहेत. परिणामी, अल्पभूधारक शेतकरी आणि बेरोजगार तरुण वयाची उशिराची वर्षे गाठूनही लग्नापासून वंचित राहत आहेत.
याच सामाजिक समस्येकडे प्रशासनाचे आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे अनोखे आंदोलन छेडले आहे.
शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळावी यासाठी समाजकल्याण विभागामार्फत ‘सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी केंद्र’ सुरू करण्यात यावे, विवाहबद्ध होणाऱ्या अशा तरुणांना १ लाख रुपयांचे लग्न अनुदान देण्यात यावे, निवाऱ्यासाठी २ लाख रुपयांचे घरकुल मंजूर केले जावे, तसेच स्वावलंबनासाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी २ लाख रुपयांचे बिनव्याजी व विनाजामीनदार कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
शेतकरी आणि बेरोजगार तरुणांच्या लग्नाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, किसनदेव ननावरे यांच्या या आंदोलनाने सोलापूर जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. प्रशासन यावर काय पाऊल उचलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
