बेनापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, वाळूजच्या महिला पैलवानांनी दमदार कामगिरी केली आहे. विद्यालयाच्या तिन्ही महिला मल्लांनी आपल्या-आपल्या वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
बेनापूर, ता. खानापूर येथे तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, वाळूजच्या महिला पैलवानांनी तालुक्यातील आपले अव्वल स्थान कायम राखले.
१४ वर्षांखालील मुलींच्या ३० किलो वजन गटात आरोही घाडगे, १७ वर्षांखालील मुलींच्या ४० किलो वजन गटात शिवानी घ्यार, तसेच ५३ किलो वजन गटात अक्षरा पाटोळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
या तिन्ही खेळाडूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडूंना संजय अवघडे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या सातत्यपूर्ण सरावाला आणि मेहनतीला मिळालेले हे यश विद्यालयासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
यशस्वी खेळाडूंचे इंदिरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र (अण्णा) देशमुख, सचिव प्रा. कृष्णराव देवकर, सर्व संस्था संचालक, माजी मुख्याध्यापक कुबेर वीर आणि मुख्याध्यापक शिवाजी राठोड यांनी अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
