यवतमाळ : विमुक्त-भटक्या समाजाचे कैवारी,दलीतमित्र, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे संस्थापक सदस्य, बंजारा समाजाचे प्रथम थोर स्वातंत्र्य सेनानी पद्मश्री स्व.रामसिंगजी भानावत यांचे योगदान देश आणि समाजासाठी खूप मोठे असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून गांधीनगर, दिग्रस रेल्वे स्थानकास रामसिंगजी भानावत यांचे नाव देणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते प्यारेलाल सगणे यांनी व्यक्त केले.

रामसिंग भानावत हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असून देश-विदेशात जावून त्यांनी रोमा,जिप्सी बंजारा समाजाला जोडण्याचे कार्य केले आहे.पायाला भिंगरी बांधुन समाजाच्या एकत्रीकरणासाठी आपले जिवन वेचले,अशा महामानवाचे कार्य विसरून चालणार नाही. शेतजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना शेती उपलब्ध करून देत त्यांना सोयीसुविधा देण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन व प्रयत्न त्यांनी केले. विमुक्त- भटक्या समाजातील अनेक गोर गरीबांना शेतजमीनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.अनेक गोरगरीब आज शेतजमीन कसत आहेत,ते त्यांच्या प्रयत्नांचे फलित आहे.गल्लीपासून दिल्लीपर्यंत मजल मारत समाजाला सामाजिक स्थान मिळवून देणाऱ्या या महामानवाच्या नावाने गांधीनगर रेल्वे स्थानक ओळखले जावे,असे मत सामाजिक कार्यकर्ते प्यारेलाल सगणे यांनी व्यक्त केले.