यावल येथील उर्दू हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रहीम रजा यांच्या ‘रजनीश ही सही’ या पुस्तकातील दोन कथांचा बी.ए. अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या यशाबद्दल यावल शहरासह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांकडून त्यांचे कौतुक आणि सत्कार करण्यात येत आहेत.
रहीम रजा यांचे ‘रजनीश ही सही’ हे पुस्तक २००२ मध्ये प्रकाशित झाले होते. या पुस्तकातील दोन कथांचा बी.ए. अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल भुसावळ येथील मोहम्मदी सोसायटीतर्फे अलवीया उर्दू हायस्कूलमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
एकता एज्युकेशन सोसायटी, जळगावचे अध्यक्ष करीम सालार यांच्या हस्ते शाल, ट्रॉफी आणि पुष्पहार देऊन रहीम रजा यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष सईद खान, खजिनदार इस्माईल इंजिनियर, सलीम शेठ, मोहम्मद जुबेर रसूल खान आणि डॉ. साजिद कादरी यांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमात एस. एम. शकील बुऱ्हाणपूरकर लिखित ‘खिरमन’चे विवेचन हाजी अन्सार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. साजिद कादरी, डॉ. अतिक कुरेशी, बी. झेड. ज्युनिअर कॉलेज भुसावळचे माजी प्राचार्य आंबिल सर, अय्युब सर, मुश्ताक क्रीमी आणि माजी प्राचार्य काझी जमीर अश्रफ यांच्यासह विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अल हिरा प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थीही कार्यक्रमात सहभागी झाले.
रहीम रजा यांनी यावल येथील उर्दू हायस्कूलमध्ये अनेक वर्षे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
