मुंबईतील अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक आणि ऐतिहासिक स्मारकाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा दावा किनगावच्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीने केला आहे. याबाबत समितीने थेट मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समिती, किनगाव, ता. यावल, जि. जळगाव यांच्या वतीने स्मारकाचे काम तातडीने सुरू व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे राज्यपाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच राज्यातील सर्व खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांना लेखी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, शासन स्तरावरून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने समितीचे अध्यक्ष मोहन रमेश पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
यावेळी मोहन पाटील यांनी मुंबईतील स्मारकाची संपूर्ण परिस्थिती आणि आतापर्यंत केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती जरांगे पाटील यांना दिली. समितीच्या म्हणण्यानुसार, जरांगे पाटील यांनी हा मुद्दा उचलून धरू आणि जोपर्यंत महाराजांचे ऐतिहासिक स्मारक मुंबई येथे होत नाही, तोपर्यंत समितीसोबत ठाम उभे राहण्याचे आश्वासन दिले.
