जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या ‘यथाकोष्ठ’ या गणितीय मॉडेलने माध्यमिक गटात तृतीय क्रमांक पटकावला असून, आता या मॉडेलची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
जिल्हा परिषद जळगाव आणि पंचायत समिती यावल यांच्या संयुक्त विद्यमाने पोदार इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, अकलूद येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘यथाकोष्ठ’ या गणितीय मॉडेलने माध्यमिक गटात तृतीय क्रमांक मिळवला.
गणितातील क्लिष्ट गणना सोप्या, सुटसुटीत आणि रंजक पद्धतीने करता याव्यात, या अभिनव संकल्पनेवर हे मॉडेल साकारण्यात आले आहे. नावीन्यपूर्ण रचना, उपयुक्त संकल्पना आणि प्रभावी सादरीकरणामुळे या मॉडेलने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या यशामुळे मॉडेलची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
या गणितीय मॉडेलच्या निर्मितीसाठी आर. व्ही. महाजन, एन. व्ही. ओतारी, के. आर. सोनवणे, एम. ए. महाजन, डी. पी. माळी, एन. व्ही. सोनवणे आणि व्ही. एस. बडगुजर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई वसंतराव महाजन, उपाध्यक्ष सुभाष भास्करराव महाजन, कार्याध्यक्ष प्रमोद रमेश सोनवणे, संचालक श्यामकांत वसंतराव महाजन यांच्यासह सर्व संचालक मंडळाने विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. जे. महाजन, उपमुख्याध्यापक एस. जे. पवार आणि शिक्षकवृंद यांनीही या यशाचे कौतुक करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.
‘यथाकोष्ठ’च्या यशामुळे शारदा विद्या मंदिरच्या शैक्षणिक आणि नवोपक्रमशील वाटचालीला नवी प्रेरणा मिळाली असून, जिल्हास्तरीय प्रदर्शनातही हे मॉडेल यश संपादन करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
