नंदुरबार : वडाळी (ता.शहादा) येथे 17 मार्चला बाहेरो लग्नोत्सव होणार आहे. यानिमित्त 17 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याला नावनोंदणी केलेल्या जोडप्याचे बाहेरो लग्न होणार असून, कानुमाता बाहेरो विवाह सोहळ्यात लग्न लावण्यासाठी इच्छुकांनी संपर्क साधून, विवाह विनामूल्य लावावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने सुशीलाबाई माळी, रमेश माळी आणि देविदास माळी यांच्या निवासस्थानी बोहेरो लग्नाचा योग्य आला असून, गुरूवारी (ता. 17) ध्वजारोहन, दांडा रोहणे, रविवारी ( ता.03 एप्रिल ) गायपूजन व कुदळी टाकणे, मंगळवारी (ता. 05) कानुमातेचे रत्न आणणे, पोखणे, बुधवारी (ता. 06), कस्तुरी आणणे, गवरणी विडा, कानुमाता मिरवणूक थाट, गुरुवारी (ता.07) रास पूजने, माल दळणे शुक्रवारी (ता.08) पीठ गाळणे, गाणे म्हणणे शनिवारी (ता.09) पाणी भरणे, कन्हेर आणणे, गवरणीच आगमन रविवारी (ता.10) भोजन भरणे, महाप्रसाद व सायंकाळी सहाला बाहेरो लग्न लावणे, सोमवारी (ता. 11) कानूमाता विसर्जनाचा कार्यक्रम, असे आठ दिवसांचे कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. आठ दिवस चालणाऱ्या कानुमातेच्या विधिवत पूजेसाठी व बाहेरो लग्न समारंभासाठी माजी पं.स.समिती सदस्य गिरीष जगताप, पोलीस पाटील गजेंद्रगिर गोसावी,माजी उपसरपंच हिंमत सोनवणे, माजी सरपंच रामू भिल, राजेंद्र झाल्टे, ईश्वर सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. आयोजक म्हणून सुशिलाबाई माळी, रमेश माळी, देविदास माळी व वडाळी ग्रामस्थांचे सहकार्य लाभणार आहे.
प्रतिक्रिया -” वडाळी ता.शहादा येथील देविदास दाजमल माळी यांना महाशिवरात्रीच्या रात्री त्यांच्या घरात नारळात कानुबाई मातेचा साक्षात्कार झाला असल्याने त्यांनी कानुमाता उत्सव लग्न सोहळा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. गावकऱ्यांनी एकत्रित येत बैठक घेवून कानुमातेचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.” – ईश्वर सोनवणे, गावकरी
प्रतिनिधी – सुनिल माळी