नगर : कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे. बाजारपेठेत गर्दी वाढत असून नागरिकांकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. यामुळे पोलिसांसह महापालिकेच्या पथकांकडून प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी प्रभाग निहाय चार व शहरभर गर्दीच्या ठिकाणी कारवाईसाठी दोन अशा सहा पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती, आयुक्त शंकर गोरे यांनी दिली. उपअभियंता परिमल निकम, सहाय्यक आयुक्त दिनेश सिनारे, सहाय्यक सांख्यिकी अधिकारी आर. बी. कोतकर, प्रभागी अधिकारी एन. बी. गोसावी या पथक प्रमुख्यांच्या चार प्रभाग समितीत पथक नियम मोडणार्यांवर कारवाई करणार आहे. शहरभर गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी व कारवाईसाठी दोन विशेष पथक प्रभाग अधिकारी जी. एल. सारसर व उद्यान विभागाचे एस. बी. नजन यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक कार्यरत असणार आहे. कोरोना रूग्णांची संख्या घटत असल्याने नगर शहरात निर्बंध शिथील करण्यात आले. नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परंतु, खरेदीसाठी बाहेर पडणार्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना चित्र शहरभर दिसत आहे. यामुळे प्रशासनाकडून कारवाई अधिक कडक करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क नसल्यास दोशने रूपये दंड आहे. हॉटेल, मंगलकार्यालय, जीम, चौकातील गर्दीचे ठिकाणे शारिरीक अंतराचे पालन न केल्यास पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.