गडचिरोली : वेगळा विदर्भ राज्य घोषित करण्याची वैदर्भीय नागरिकांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे मात्र अजूनही ती मागणी पूर्ण होऊ शकली नाही. विदर्भ राज्य वेगळा होऊ न शकल्याने विदर्भाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. अनेक कामे रखडलेले आहेत. महाराष्ट्र राज्यात नोकर भरती बंद असल्याने लाखो बेरोजगार युवक रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकत आहेत. पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी कमी असल्याने बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही परिणामी या भागातील युवक हताश झाला असून तो वाम मार्गाकडे वळलेला आहे. बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व विदर्भाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी वेगळा विदर्भ राज्य निर्माण करण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत अशासकीय ठराव मांडुन केली व या वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
वेगळा विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने, उपोषणे करण्यात आली. अनेकदा शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र विदर्भ राज्य वेगळा होऊ शकला नाही. त्यामुळे या क्षेत्रातील आदिवासी व ग्रामीण भागाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे व कारखाने कमी प्रमाणात असल्याने युवकांना रोजगार उपलब्ध होत नाही त्यामुळे बेरोजगार युवक हताश होऊन वणवण भटकत आहे. वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती झाल्यास विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल व लाखो बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळून ते विकासाच्या प्रवाहात सामील होतील त्यामुळे केंद्र सरकारने उचित निर्णय घेऊन तातडीने वेगळा विदर्भ राज्य घोषित करावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी संसदेच्या सभागृहात अशासकीय ठरावाच्या माध्यमातून केली.

(सतीश आकुलवार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *