(सचिन बिद्री:उमरगा)
उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरात डुक्करांची वाढती संख्या व त्यामुळे होणारी रोगराई, गलिच्छ परिसरामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. वेळोवेळी जनतेतून स्वच्छतेबाबत नगर पालिकेला विनंती करूनही यावर उपाययोजना होत नसल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात होता.दरम्यान ४ जुलै रोजी उमरगा नगरपालिकेला मा.दिवाणी न्यायाधीश महोदयांनी पत्र काढून डुक्करांचा योग्य तो बंदोबस्त करण्याचे आदेश उमरगा नगर पालिकेला केले,परिणामी डुक्करे पकडून त्यांचा बंदोबस्त होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

मा.दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तराद्वारे देण्यात आलेल्या सदर पत्राद्वारे उमरगा न.प ला कळविण्यात आले होते की,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर उमरगा यांच्या शासकीय निवासस्थानासमोर डुक्करांची संख्या वाढली आहे त्यामुळे शासकीय निवासस्थानाचा परिसर स्वच्छ व निरोगी ठेवणे कठीण जात आहे.शासकीय निवासस्थानाचे नुकसान होत आहे. रोगराई टाळण्यासाठी त्वरीत डुकरांचा योग्य तो बंदोबस्त करणे आवश्यक आहे.माननीय न्यायालयाच्या या पत्रामुळे अखेर उमरगा नगर पालिकेला जाग आली आणि अंमलबजावणीस सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.जसे डुक्करांचा बंदोबस्त होतोय तसेच आता शहरातल्या प्रत्येक प्रभागातील उघड्यावर साचलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन होणे तितकेच महत्वाचे आहे कारण शहरातील प्रभागात साचलेल्या कचऱ्यांचे ढिगाऱ्यामुळे परिसरात होणारी दुर्गंधी आणि रोगराई वाढत असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नगरपालिकेला येणारा महिन्याकाठी लाखो रुपयांचा निधी नेमकं कुठे खर्च होतोय.?हा प्रश्नही जनतेतून विचाराला जातोय.
–//–
“डुक्करांचा बंदोबस्त करण्यात येत आहे,स्वच्छता मोहिमेअंतर्गत शहर- परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना आखल्या जात असून जनजागृतीवर अधिक भर दिला जात आहे. नागरिकांतुन उत्तम प्रतिसाद भेटत आहे.”— श्री जाधवर रामकृष्ण,प्रशासक न.प.उमरगा