सांगली : गेल्या महिन्यात कृष्णा नदीपात्रात लाखो मासे मृत झाले होते. याची गंभीर दखल घेत हरित लवादाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश बुधवारी दिले. न्यायाधीश दिनेशकुमार सिंग, शिवकुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांनी हा आदेश दिला.
दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीत लाखो मासे मृतावस्थेत आढळून येतात. साखर कारखान्याकडून घातक रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जाते. काही उद्योजकांकडूनही घातक रसायने नदीपात्रात सोडली जातात. त्यातून लाखो मासे मरतात. यंदाही हा प्रकार घडला होता. याप्रकरणी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सुनील फराटे व ॲड. ओंकार वांगीकर यांनी हरित न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली.
याचिकेत प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रतिवादी केले आहे. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दूषित पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. हरित न्यायालयानेही या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, मत्स्य विभागाचे अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करून दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहे.