‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’चा शुभारंभ,नागरिकांना मिळणार सेवा

गोंदिया:-
सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी जिल्हाभर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ आज जिल्हा परिषद गोंदिया येथे जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सेवा पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून शुभारंभ करण्यात आला.
सेवा पंधरवड्यात नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी प्राधान्याने निकाली काढाव्यात. तसेच शासनाच्या विविध विभागाच्या सेवांचा लाभ द्यावा. नागरिकांना प्रशासनाकडून सुशासनाचा अनुभव यावा व त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे असे पंकज रहांगडाले व अनिल पाटील यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयापर्यंत येण्याची आवश्यकता पडू नये यासाठी स्थानिक पातळीवर समस्यांचा निपटारा व्हावा. नागरिकांना प्रशासनाकडून सुशासनाचा अनुभव यावा त्यांची कामे गतीने आणि पारदर्शकपणे व्हावीत या उद्देशाने शासनाने सेवा पंधरवडा आयोजित केला आहे.

१० सप्टेंबर पर्यंतच्या तक्रारींचा होणार निपटारा

या सेवा पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डी.बी.टी., नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल अशा वेबपोर्टलवर १० सप्टेंबर २०२२ पर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्राम विकास, नगर विकास, आरोग्य, पाणी पुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील सेवांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

विविध विभागांच्या १४ सेवांचा समावेश

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण करणे, तांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, फेरफार नोंदीचा निपटारा करणे, शिधापत्रिकांचे वितरण,विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अतंर्गत सिंचन विहिरी करिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्योची ऑनलाईन नोंदणी करणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मजूर करणे (अपिल वगळून), दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे अशा सेवांचा लाभ या पंधरवडा कार्यक्रमात नागरिकांना देण्यात येणार आहे.
प्रलंबित प्रकरणांपैकी कितीचा निपटारा झाला आणि निपटारा न झालेल्या प्रकरणांविषयी सेवा पंधरवडा समाप्तीनंतर ५ ऑक्टोबर रोजी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे. सेवा पंधरवडयातील कामकाजाचा प्रगती अहवाल प्रमाणपत्रासह १० ऑक्टोबर पर्यंत शासनास सादर करण्याच्या सूचना देखील प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी यावेळी केल्या. शासन आपल्या दारी या उद्देशाने सेवा पंधरवडा आयोजित केला असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पंकज रहांगडाले व अनिल पाटील यांनी नागरिकांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *