पुणे : कोरडवाहू शेतजमिनीला शाश्वत पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची येथे वॉटर संस्था, जॉन डिअर कंपनीच्या सहकार्याने तीन भागात ३०० ते ४०० मीटर लांबीचे ओढा खोलीकरण, रूंदीकरण ,डीप सीसीटी खोदकाम करण्यात आले.
ओढा खोलीकरण, रूंदीकरणामुळे पाण्याचा प्रश्न सुटला असून ओढ्यालगतच्या कोरडवाहू शेतजमिनीला शाश्वत पाणी उपलब्ध झाले आहे. जिरायत शेतीचे बागायत शेतीमध्ये रूपांतर होणार असल्याची माहिती चिंचोली मोराची येथील नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनचे पदाधिकारी पोपट उकिर्डे व ग्रामस्थांनी दिली.
ओढा खोलीकरण,रूंदीकरणाच्या कामी वॉटर स़ंस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक संतोष चौधरी , शेतकरी चंद्रकांत नाणेकर, सुरेश नाणेकर, नारायण नाणेकर, नानाभाऊ नाणेकर, दत्तू पाटील नाणेकर, साहेबराव नाणेकर, राजाराम नाणेकर, मच्छिंद्र थोपटे, जयसिंग नाणेकर, गणेश नाणेकर, मोहन नाणेकर, शरद नाणेकर, संपत नाणेकर, मंगेश नाणेकर यांनी सहकार्य केले.
ओढा खोलीकरण व रूंदीकरणाच्या कामास जमीनधारक ,ओढ्यालगतच्या शेतक-यांनी केलेल्या सहकार्याचे कौतुक करून पुढील काळात उर्वरित क्षेत्रावर अशा प्रकारची कामे व्हावीत अशी अपेक्षा सरप़ंच अशोकराव गोरडे यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रकल्पाचा लाभ ८० ते १०० शेतक-यांना झाला असून उपसरपंच राहूल नाणेकर यांनी समाजासाठी व समाजोपयोगी कामांवर भर देवून जलसंधारणासह इतर नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याने शेतक-यांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाल्याचे पोपट उकिर्डे यांनी सांगितले.
