शोषितांना मुख्य प्रवाहात आणा – वैजापूरच्या महाविधी शिबिरात जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांचे प्रतिपादन वैजापुरच्या महाविधी शिबिरात योजनांचा ऊहापोह

वैजापूर, ६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच न्यायापासून कुणीही व़चित राहू नये व समाजातील शोषित, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी न्यायव्यवस्थेसोबतच सर्व यंत्रणांनी कसोशीने प्रयत्न करावेत असे आवाहन औरंगाबाद येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश विभा इंगळे यांनी केले.

तालुका विधी सेवा समिती व अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वकील संघ वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत न्यायालयाच्या प्रांगणात महाविधी साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम.ए., अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणवीस, उपविभागिय पोलिस अधिकारी (वैजापूर) महक स्वामी, उपविभागिय पोलिस अधिकारी प्रकाश बेले (गंगापूर), वैजापूर वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. किरण त्रिभुवन यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शिबिरात पंचायत समिती, नगरपालिका, तहसिल कार्यालय, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, भुमी अभिलेख अशा विविध विभागांचे 28 स्टॉल्स उभारण्यात आले होते. या स्टॉल्सच्या माध्यमातुन संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांना योजनांची माहिती असणारे प्रसिद्धीपत्रकांचे वाटप करत माहिती दिली. प्रमुख जिल्हा न्यायाधिश विभा इंगळे, जिल्हा न्यायाधिश मोहम्मद मोहियोद्दीन यांच्यासह मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी तहसिलदार राहुल गायकवाड व गटविकास अधिकारी विठ्ठल हरकळ यांनी तहसिल कार्यालय व पंचायत समितीच्या माध्यमातुन राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची विस्तृतपणे माहिती दिली.

उपविभागीय पोलिस अधिकारी महक स्वामी व वकिल संघाचे अध्यक्ष किरण त्रिभुवन यांनी विचार मांडले. ॲड. प्रमोद जगताप, ॲड. अनिल रोठे, ॲड. प्रवीण साखरे, ॲड. आसाराम रोठे, ॲड. सोपान पवार, ॲड. जे.डी. हरिदास, ॲड. चैतन्य हरिदास, ॲड. प्रदीप बत्तासे, ॲड. प्रताप निंबाळकर, ॲड. राधाकृष्ण थोट, ॲड. महेश कदम, ॲड. राजेंद्र हरिदास, ॲड. निखिल हरिदास, ॲड. कृष्णा गंडे, ॲड. राधाकृष्ण बोडखे यांच्यासह वकिल संघाच्या सदस्यांनी कन्नड, गंगापूर, खुलताबाद व फुलंब्री येथून शिबिरासाठी आलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ) श्रीमती व्ही. आर. कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमात नंदकुमार शिंदे फार्मसी कॉलेजच्या चमुने कायद्याबाबत जनजागृती करणारे नाट्य सादर केले.‌ सामाजिक कार्यकर्ता सुमीत पंडित यांनी चार्ली चाप्लिनच्या वेशभुषेत रस्ते वाहतुक सुरक्षा व कायदा याबाबत गीताच्या माध्यमातुन प्रासंगिक सादर करत सर्वांचे लक्ष वेधले. त्याला वेदांतनगर पोलिस ठाणे औरंगाबाद यांचे सहकार्य मिळाले.

वैजापूर, Aurangabad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *