नळदुर्ग:- ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गावगाड्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आला असून तुळजापूर तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे व तालुक्यातील राजकारणात महत्त्वाचे गाव असलेल्या वागदरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.तेजाबाई शिवाजीराव मिटकर ह्या पूर्ण पॅनलच्या बहुमताने निवडून आल्या.
गेल्या दहा वर्षापासून सत्ताधारी गटाने गावाच्या विकासासाठी दाखवलेली अनास्था यामुळे मतदारांमध्ये नाराजी होती.त्याशिवाय संत भगवानसिंग महाराज ग्रामविकास पॅनेलने सर्वसामान्य माणसाला विश्वासात घेऊन गावाच्या विकासासाठी केलेला आराखडा गावातील रस्ते,शिक्षण,आरोग्य,पाणी,विज यावर भर देऊन गावाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याचे
केलेले सादरीकरण त्यामुळे सुरुवातीपासूनच ही निवडणूक एकतर्फी झाली होती.त्यामुळे तेजाबाई मिटकर ह्या विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या.
नवनियुक्त सरपंच सौ.तेजाबाई शिवाजीराव मिटकर ह्या सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक श्री.शिवाजीराव मिटकर यांच्या पत्नी तर शिक्षक नेते सोसायटीचे चेअरमन श्री.प्रशांत मिटकर व राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य श्री उमाकांत मिटकर यांच्या मातोश्री आहेत.