ज्येष्ठ साहित्यिक फ.म.शहाजिंदे यांची प्रकट मुलाखत तर पत्रकार/साहित्यिक चोरमारे यांचे अध्यक्षीय भाषण
सचिन बिद्री:उमरगा
प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने समाजात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात.दि.१२ फेब्रूवारी (रविवार) रोजी उमरगा शहरात वाचनालयाच्या वतीने ‘पुस्तकपालखी/ग्रंथदिंडी’ फिरवण्यात आली. पुस्तकपालखीत पुस्तके टाकण्याचे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले होते.शहरात जागोजागी पुस्तकपालखीचे स्वागत झाले.दरम्यान पुस्तकपालखीत संजय सरपे, एजाज पटेल, अनिल मदनसूरे, दत्तात्रय सरपे,पप्पू स्वामी,कमलाकर भोसले, विश्वनाथ महाजन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, जिल्हा ग्रंथालय निरीक्षक सुधीर आचार्य, बळीराम घुले, महेश पाटील, अशोक पाटील आदी मान्यवरांनी पुस्तके देवून सहकार्य केले.

दुपारच्या सत्रात पंचायत समिती सभागृहात ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक फ.म.शहाजिंदे यांची ॲड.शीतल चव्हाण यांनी मुलाखत घेतली.मुलाखतीत फ.म.शहाजिंदे यांनी रझाकाराच्या धामधूमीपासून ते आजच्या धर्माच्या नावाच्या आडून श्रमिकांची लूट करणाऱ्या नवसाम्राज्यवादी व्यवस्थेतल्या बहुजन,कष्टकऱ्यांच्या जगण्यातील संघर्षांबद्दल सविस्तर उत्तरे दिली. तसेच रझाकारात हत्या झालेल्या मुस्लिम बापाचा हिंदूने वाचवलेला मुलगा,औरंगाबाद येथे श्रम करुन शिकणारा विद्यार्थी व प्राध्यापकी करताना घडत गेलेला साहित्यिक या प्रवासातील संघर्ष व अनुभव सांगितले.मुलाखती दरम्यान शहाजिंदे यांनी त्यांच्या विद्रोही, मिश्किल तसेच उपरोधिक कविता व ‘मीतू’ ही पत्रात्मक कादंबरी कशी साकारली याबाबत मोकळेपणाने गप्पा मारल्या.

कार्यक्रमासाठी कमलाकर भोसले, सुमनताई पवार व अनिता मुदकन्ना हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.अनिता मुदकन्ना यांनी कवियत्री होण्याच्या प्रवासातील त्यांचे अनुभव सांगण्यासह त्यांच्या काही कवितांचे वाचन केले.पत्रकार व साहित्यिक विजय चोरमारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय समारोपात त्यांनी शिक्षणाच्या भगवीकरणाव, देशातील सध्याच्या फॅसिस्ट वृत्तीच्या राजकारणावर व यातून बाहेर पडण्यासाठी वाचन संकृती रुजवण्याच्या आवश्यकतेवर भाष्य केले. प्रास्ताविक ॲड. शीतल चव्हाण, सुत्रसंचालक प्रा. धनाजी थोरे तर आभार प्रदर्शन ॲड. ख्वाजा शेख यांनी केले.

दोन्ही उपक्रम पार पाडण्यासाठी सत्यनारायण जाधव, व्यंकट भालेराव, किशोर औरादे, करीम शेख, धानय्या स्वामी, राजू बटगिरे, प्रदिप चौधरी, दादा माने, निसार औटी, फारुख शेख, अखिल शेख आदींनी पुढाकार घेतला.