नगर- परिस्थितीअभावी महिला कधी कधी आरोग्योपचार घेण्याचे टाळतात. त्यांना नजरेसमोर ठेवून ‘सुरभि’ने सुरू केलेली महिला आरोग्य सन्मान योजना आणि गर्भवती महिलांसाठीची ‘एएनसी’ कार्ड योजना प्रेरणा देणारी व समाजामध्ये बदल घडवणारी आहे, असे गौरवोद्गार नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनिताताई शंकरराव गडाख यांनी काढले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सुरभि’ने सुरू केलेल्या महिला आरोग्य सन्मान योजनेचा शुभारंभ माजी सभापती सुनिता गडाख यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. सुरभिचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. वैभव अजमेरे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी नगरसेविका दीपाली बारस्कर, भैरवनाथ पतसंस्थेच्या चेअरमन शकुंतला पवार, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुलभा पवार, रेडिओलॉजीस्ट डॉ. कोमल अजमेरे, मनीषा कोठारी, डॉ. राजश्री आवारे, सौ. सोनल डुंगरवाल, सौ. श्वेता कोठारी, सीए प्रिती बोरा, श्रद्धा देवगांवकर, राजश्री गांधी, सुजाता पायमोडे, वैशाली चोपडा, मेघना मुनोत, वर्षा फंड, पायल कटारिया, संगीता जाधव, शैला बेल्हेकर, रुपाली बाफना, सविता बोठे आदी उपस्थित होते.
सुनिता गडाख म्हणाल्या, “स्त्री ही बंधनात जखडून गेलेली होती. मात्र, सद्य परिस्थितीत ती पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे चित्र पहावयास मिळते. केंद्र व राज्य सरकारच्या महिलांना सक्षम करण्यासाठीच्या विविध योजना आहेत. प्रत्येक स्त्रीमध्ये करुणा असते. संघर्षातून महिला कणखर बनलेली आहे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी ती लिलया पेलते. मदर तेरेसासारख्या अनेक महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. या नारी शक्तीचा सुरभि गौरव करते आहे, ही बाब समाधान देणारी आहे.
यावेळी चेअरमन डॉ. वैभव अजमेरे यांनी महिला आरोग्य सन्मान योजनेंतर्गत गर्भवती महिलांना माफक दरात एएनसी कार्ड उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. या कार्ड अंतर्गत दर महिन्याला तपासणी, रक्त तपासणी, सोनोग्राफी आदी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात ‘सुरभि’च्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुलभा पवार यांनी आरोग्य सन्मान योजनेची माहिती दिली. तसेच महिलांनी आपली आरोग्याची काळजी घ्यावी. त्यासाठी सुरभि हॉस्पिटल परिवार मदतीसाठी नेहमी अग्रेसर असल्याचे सांगितले.
यावेळी नगरसेविका दीपाली बारस्कर, सुजाता पायमोडे, श्वेता कोठारी यांनी मनोगत व्यक्त केले. सीए बोरा यांनी महिलांवरील कवितेचे सादरीकरण केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. राजश्री आवारे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सोनल व्यवहारे यांनी केले, तर श्रीमती संचिता मनवेलीकर यांनी उपस्थित यांचे आभार मानले.