जि.प. अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांचे प्रतिपादन : विविध निर्णय केले जाहीर

कारंजा तालुक्यातील गायवळला स्मार्ट ग्रामचा प्रथम पुरस्कार

जिल्हयातील 6 गावांना मिळाले स्मार्ट ग्राम पुरस्कार

विभागीय वर्‍हाडी जत्रेचा हजारो महिलांच्या उपस्थितीत शुभारंभ

वाशिम – कर्त्या पुरुषाला मदत करण्याच्या भूमिकेमुळे जिल्हयात महिला बचतगटांनी मोठी झेप घेतली असून या बचत गटांचे चांगले मार्केटींग झाले आहे. बचत गटाच्या या कार्यामुळे वाशिम जिल्ह्याचा देशात नावलौकीक झाला असून आपला जिल्हा देशात दुसरा क्रमांकावर असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांनी केले आहे.


विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. वाशिमच्या संयुक्त विद्यमाने आज 18 मार्च रोजी स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलात विभागातून आलेल्या महिलांच्या भरगच्च उपस्थितीत महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तु व खाद्यपदार्थाच्या भव्य विभागीय प्रदर्शन व विक्री अर्थात वर्‍हाडी जत्रेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक, जि.प. सिईओ श्रीमती वसुमना पंत, समाजकल्याण सभापती अशोक डोंगरदिवे, जि.प. सदस्य पांडूरंग ठाकरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधिश विजय टेकवाणी, अमरावती विभाग उपायुक्त राजीव फडके, प्रमोद लळे, अति. मुकाअ सुनिल निकम, उमेदचे प्रकल्प संचालक किरण कोवे, कारंजा पं.स. सभापती प्रदीप देशमुख, उपमुकाअ गजानन वेले, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता खारोळे, उपमुकाअ पंचायत डिगांबर लोखंडे, कृषी अधिकारी बंडगर, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सुधीर खुजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर बंजारा महिला भगिनींनी आपल्या पारंपारीक वेशभूषेत आणि बोलीभाषेत अप्रतीम असे नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. प्रास्ताविकातून बोलतांना मुकाअ श्रीमती वसुमना पंत म्हणाल्या की, आपल्या जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचे महिलांचे विभागीय विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यात अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिमजिल्हयातील महिला बचत गटांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून महिलांना स्वत: उत्पादीत केलेल्या वस्तुुंच्या विक्रीसाठी सशक्त व्यासपीठ मिळाले असून या महिलांना प्रोत्साहीत करण्यासाठी जनतेने मोठ्या प्रमाणात प्रदर्शनीला भेट देवून वस्तुंची खरेदी करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी श्रीमती पंत यांनी वर्ष 2022-23 मध्ये बचत गटासाठी शासनाने दिलेले उद्दीष्ट फेब्रुवारी मध्येच पुर्ण केले असून बचतगटांना फिरत्या निधीचेही वाटप केल्याची माहिती दिली.


अध्यक्षीय भाषणातून बोलतांना जि.प. अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला बचतगटा विषयी संमत झालेल्या विविध निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, या प्रदर्शनीच्या यशस्वीतेनंतर महाग्राम पुरस्काराचा निर्णय घेण्यात आला असून महिला बचत गटाच्या वस्तु विक्रीसाठी स्टॉल व तालुका स्तरावर शॉपिंग सेंटरचे निर्माण करण्यात येईल. याची अंमलबजावणी येत्या 1 एप्रिलपासून करण्यात येणार असून पुढच्या वर्षी जिल्हास्तरीय प्रदर्शनी घेण्यात येणार असल्याचेही चंद्रकांतदादा ठाकरे यांनी जाहीर केले.

जि.प. सदस्य पांडूरंग ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून महिला शक्तीच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, स्त्रीने मनात आणले तर ती काहीही करु शकते. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उध्दारी या उक्तीनुसार हे प्रदर्शन स्त्रीशक्तीचा कार्यक्रम असून तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्हयात बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार्‍या महिला समुहांना शासकीय मदतीची गरज असून स्त्रियांमध्ये पुढे जाण्याची मोठी जिद्द आहे. वाशिमची तुरदाळ ही सर्वोत्कृष्ट असून या बचत गटांना दालमिलच्या मशीन दिल्यास वाशिम जिल्हा तुर निर्यातीचे मोठे हब झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर उपमुकाअ डिगांबर लोखंडे यांनी आर.आर. आबा सुंदर गाव पुरस्कार योजनेत निवड झालेल्या गावांची माहिती दिली. या पुरस्कारामध्ये कारंजा तालुक्यातील गायवळ ग्रामपंचायतला तालुका व जिल्ह्याचा प्रथम सुंदर गाव पुरस्कार मिळाला असून त्यानंतर रिसोड तालुक्यातील गोवर्धन, मंगरुळपीर तालुक्यातील जांब, वाशिम तालुक्यातील ब्रम्हा, मानोरा तालुक्यातील कारखेडा व मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा ग्रामपंचायतीला आर.आर. आबा तालुका सुंदर गाव पुरस्कार मिळाला आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजयी ग्रामपंचायतींना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

अपारंपारीक उर्जा संबंधीत प्रकल्प, स्वच्छता, महिला व बालकल्याण सक्षमीकरण, स्वच्छ पाणी वितरण, जीआयएस मॅपिंग, सौर पथदिवे, अतिक्रमण रोखण्यासाठी कुंपण व वायफाय सुविधा आदी निकषावर या गावांची सुंंदर गाव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार 40 लाख व तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार 10 लक्ष असे स्वरुप आहे.

कार्यक्रमाचे संचालन चाफेश्वर गांगवे यांनी तर आभार प्रदर्शन उमेदचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांनी मानले. या कार्यक्रमाला विभागातील पाचही जिल्ह्यातून महिलांची भरगच्च उपस्थिती लाभली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *