वऱ्हाडी जत्रेला वाशिमकराचा उदंड प्रतिसाद
मंगरूळपीर:-उमेद अभियानांतर्गत मागील तीन दिवसापासून सुरू असलेल्या वऱ्हाडी जत्रेमध्ये अर्थात महिला बचत गटाच्या प्रदर्शनीमध्ये सुमारे चाळीस लाखाच्या वर विक्री झाली आहे. अमरावती विभागातील जिल्ह्यातून आलेल्या महिला बचत गटाच्या स्टॉलवर वाशिमकरांनी प्रचंड गर्दी केली. या प्रदर्शनीमध्ये लोकांचा एवढा सहभाग लाभला की शेवटच्या दिवशी सकाळीच अनेक महिलांच्या दुकानावरील साहित्य संपले होते. त्यामुळे तिसऱ्या दिवशी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचा हिरमोड झाल्याचे पहावयास मिळाले तर तिन दिवस लाभलेल्या ग्राहकांच्या प्रतिसादामुळे बचत गटांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य पहावयास मिळाले.
विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद वाशिम यांच्या वतीने वाशिम येथे बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू व खाद्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्रीचे अर्थात वर्हाडी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामिण महिलांनी ऊभा केलेल्या उद्योग व्यवसायाला चालना मिळावी, त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतुने उमेद अभियानांतर्गत या वर्हाडी जत्रेचे आयोजन केले होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या नेतृत्वामध्ये आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी सुरुवातीपासूनच या प्रदर्शनी ची धुरा अत्यंत सक्षमपणे आपल्या खांद्यावर घेतली. अत्यंत सुक्ष्म नियोजन करून प्रकल्प संचालक किरण कोवे यांनी आपले सहकारी अधिकारी यांच्या साथीने आणि अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही प्रदर्शनी अभूतपूर्व अशी यशस्वी केली.
या प्रदर्शनीमध्ये उद्घाटनाच्या दिवशी 8 लाख 61 हजार रुपयाचा व्यवसाय झाला होता. तर दुसऱ्या दिवशी वाशिमकरांनी या वर्हाडी जत्रेत प्रचंड गर्दी केली होती. त्या जत्रेमध्ये लागलेल्या स्टॉल्सवर विविध पदार्थांची आणि वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांची उडी पडली होती. विशेषतः खानावळीच्या स्टॉलमध्ये एक एक तास लोक वेटिंगवर होते. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत लोकांनी जेवणासाठी व घरी पार्सल नेण्यासाठी गर्दी केली होती. रविवार असल्यामुळे या यात्रेमध्ये आकर्षण असलेला मटन मांडे, चिकन मांडे, मटन- पातळी बाटी या पदार्थाला ग्राहकांनी विशेष पसंती दिली होती. त्यामुळे रविवारी सर्वाधिक रुपये 19 लाख 65 हजार रुपयांची विक्री या वर्हाडी जत्रेमधील स्टॉलमध्ये झाली. त्या दिवशीचा प्रचंड प्रतिसाद पाहून प्रदर्शनी मध्ये स्टॉल्स लावलेल्या बचत गटाच्या महिलांनी तसेच स्थानिक नागरिकांनी प्रदर्शनी ची मुदत आणखी दोन दिवस वाढवण्याची मागणी केली होती. अनेक वस्तू तिसऱ्या दिवशी सकाळीच संपल्या होत्या. या दिवशी संध्याकाळपर्यंत हजार रुपया चा व्यवसाय या महिला बचत गटांनी केला होता. तिन दिवसाची एकूण विक्री 40 लाख 36 हजार एवढी विक्रमी विक्री झाली होती. प्रदर्शनीच्या पहिल्या दिवशी सायंकाळी अवकाळी पाऊस आल्याने या बचत गटातील महिलांची काही वेळ तारांबळ उडाली होती. वसुमना पंत यांनी त्याही परिस्थितीत भर पावसामध्ये या प्रदर्शनीमध्ये येऊन गटाच्या महिलांना धीर दिला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी या महिलांनी नव्या उमेदीने आपली दुकाने थाटली आणि वाशीमकरांनीही त्यांना उदंड प्रतिसाद देऊन वस्तूंची खरेदी केली. तीनही दिवसांमध्ये बचत गटातील महिलांचा 40 लाख 36 हजार रुपये एवढा विक्रमी व्यवसाय झाला. रात्री उशिरापर्यंत प्रदर्शनातील काही स्टाॅल्स सुरु होते. बचतगटातील महिलांनी वर्हाडी जत्रेच्या यशाचे श्रेय सर्व वाशिमकरांना दिले. प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांच्या मार्गदर्शनात उमेदचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुधिर खुजे, प्रफुल इटाळ, संदीप ढाले यांच्यासह उमेद च्या इतर कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.सांस्कृतिक कार्यक्रमाने लोकांना जत्रेत ओढुन आणले. वर्हाडी यात्रेत तीनही दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाजे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पारंपरिक लोककलांसह विनोद, प्रबोधन आणि गित संगिताची मेजवाणी होती. एकाहुन एक सरस कार्यक्रमामुळे वाशिमकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि खरेदि सुध्दा केली.