section and everything up until
* * @package Newsup */?> 'बंजारा परंपरा आणी भोगवटा' हा बंजारा संस्कृतीला सशक्त बनविणारा ग्रंथ- डॉ. पी. विठ्ठल | Ntv News Marathi


वाशिम:- बंजारा समाजाचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे. शौर्याचा इतिहास आहे. इंग्रजांना मोठमोठाले संस्थानिक शरण गेले, परंतु भटके विमुक्त शरण गेले नाहीत; तर त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. यामध्ये बंजारा, रामोशी, भिल्ल, आदिवासी, वडार असे अनेक जातसमूह होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. यालाच  आपण १८५७ चा उठाव म्हणतो. अशा या शूरवीर बंजारा समाजाची संस्कृती अधिक सशक्त बनविणारा ‘बंजारा परंपरा आणि भोगवटा’ हा ग्रंथ आहे. या ग्रंथात डॉ. विजय जाधव फक्त समस्याच मांडत नाहीत तर समस्येतून कसे बाहेर पडायचे हे देखील सूचवितात असे प्रतिपादन डॉ. पी. विठ्ठल यांनी केले.

         यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरूळपीर आणि राजस्थान आर्यन महाविद्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बंजारा समाज आणि भोगवटा’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भाष्यकार म्हणून ते बोलत होते. या शानदार पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एस. एच. कान्हेरकर यांनी भूषविले.

           बंजारा संस्कृती ही विज्ञानवादी संस्कृती आहे. संत सेवालाल महाराज यांचे विचार बुद्धिवादी विचार आहेत. डॉ विजय जाधव यांच्या साहित्यातून हाच बुद्धिवाद विचार प्रत्येक पानांवर झळकतो असे विचार डॉ. काशिनाथ बऱ्हाटे यांनी व्यक्त केले. त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

           प्रा. ज्योत्स्ना जोशी यांनी सदिच्छापर मनोगत व्यक्त केले.  या पुस्तकाचे कव्हर पेज अतिशय बोलकी आहे. बंजारा महिला डोक्यावर गाठोडे घेऊन जात आहे. हे गाठोडे श्रमण संस्कृतीचे सूचक आहे.  स्वतःच्या कष्टांवर उपजीविका करणारी ही समाजवादी संस्कृती आहे. असे भाष्य डॉ. रमेश राठोड, अकोला यांनी केले.

       बंजारा समाजावर व्हावे तसे जोरकसपणे लेखन आजही झाले नाहीत. साहित्याच्या प्रांतात आमच्या वेदना सशक्तपणे कोणी मांडल्या नाहीत म्हणून त्या मी मांडण्याचा प्रयत्न करतोय असे ग्रंथकार डॉ. विजय जाधव यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

     या सोहळ्याला वाशिमचे सुप्रसिद्ध साहित्यिक मा. विलास अंभोरे, मोहन शिरसाट, कविवर्य अनिल कांबळे, सुरेश येरमुले, प्रा. सुनीता अवचार,अविनाश पसारकर, प्राचार्य हर्षा पसारकर प्रा. सोनू इंगळे, कारंजा येथून प्रा. अनुप नांदगावकर, नांदेडच्या सौ. सुजाता पी. विठ्ठल आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

        या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शरद वाघोळे यांनी केले. तर डॉ. प्रमोद देवके यांनी बहारदार सूत्रसंचालन आणि डॉ. साहेबराव पवार यांनी आभार मानले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *