उमरगा-लोहारा परिसरातल्या विविध क्षेत्रातील ११ व्यक्तींचा होणार सन्मान
उमरगा(प्रतिनिधी): प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय, मुळज आणि या वाचनालयाच्या उमरगा-लोहारा परिसरातील इतर १५ शाखांमार्फत समाजात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी काम केले जाते. वाचन टपरी, पुस्तक गुढी, विवेकयात्रा, पुस्तकपालखी, पुस्तक वाचणारा गणपती असे अनेक उपक्रम या वाचनालयांच्या वतीने राबविले जातात. सोबतच उमरगा-लोहारा परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार देवून सन्मान केला जातो. पुरस्कार वितरणाचे हे पाचवे वर्ष आहे.
यंदाचे पुरस्कार दि.०६ सप्टेंबर रोजी प्रा. शामराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आले आहेत. यंदा जीवन गौरव पुरस्कारासाठी मा. डॉ. चंद्रकांत महाजन – उमरगा, समाजरत्न म्हणून मा. माधवराव पाटील – उदतपूर, पत्रकाररत्नसाठी मा. जाफर जमादार – उमरगा, सहकाररत्न म्हणून मा. नानाराव भोसले – मातोळा, संगीतरत्न म्हणून मा. श्रीराम पोतदार – का. आष्टा, शिक्षकरत्न साठी श्रीमती मंकावती कांबळे – मुरुम, क्रिडारत्न म्हणून मा. अनिल मदनसूरे – उमरगा, उद्योगरत्न म्हणून मा. बालाजी गायकवाड – उमरगा, ग्रंथसेवा पुरस्कारासाठी श्रीमती चंदाराणी घोरपडे – महालिंगरायवाडी, कृषीरत्न म्हणून मा. राहुल सारडा – बलसूर तर उत्कृष्ट वाचक पुरस्कारासाठी मा. शाम हिप्परगे- मानेगोपाळ अशा ११ मान्यवरांची निवड करण्यात आल्याची माहिती वाचनालयाचे संकल्पक व संस्थापक ॲड. शीतल चव्हाण यांनी दिली.
प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण यांचा स्मृतीदिन वाचनालयाच्या उमरगा शाखेत साजरा करुन, त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. याप्रसंगी सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, ॲड. ख्वाजा शेख, शरद माने, करीम शेख, प्रदिप चौधरी, धानय्या स्वामी, किशोर बसगुंडे, राजू बटगिरे, अनुराधा चव्हाण, संतोष चव्हाण, माधव चव्हाण, ॲड. अर्चनाताई जाधव, लैखा औटी, रवी सांगवे, निसार औटी आदी पदाधिकारी उपस्थित होते.