सत्तेतल्या निकटवर्तीयांची मराठा आरक्षण आंदोलनातील लुडबुड थांबवावी.
मनोज जरांगे-पाटील हे अन्न-पाण्याचा त्याग करुन मराठा आरक्षणासाठी निकराचा लढा देत आहेत. तेच या लढ्यातील नेतृत्व आहेत. त्यांच्या आदेशाप्रमाणेच या लढाईची दिशा ठरणार आहे. पण असे असताना काल साधारणत: दुपारी १ च्या सुमारासपासुन उमरग्याच्या मराठा आरक्षण आयोजन समूहावर काही लोकांनी वेगळाच सुर आळवायला सुरुवात केली. एस. टी. स्टॅंड बंद करणे, बसेस आडवणे, चक्का-जाम, रास्ता रोको असे एक ना अनेक प्रकार काही लोक सुचवू लागले. मुळात एस. टी ही गोरगरीबांसाठीची सेवा आहे. गावखेड्यातील लोक दवाखाना, कोर्ट-कचेऱ्याची कामं, नातेवाईकांच्या भेटीगाठी अशा कारणांसाठी ही सुविधा वापरतात. या सुविधेवर हल्ला म्हणजे गोरगरिबांची नाहक गैरसोय करणे होय. म्हणून मी या प्रकाराला सुरुवातीपासून विरोध केला. डॉ. उदय मोरेंसह काही सुज्ञ लोकांनीही यास विरोध दर्शवला. पण तरीही ‘बोट वाकडे केल्याशिवाय तुप निघत नाही’ असल्या म्हणी सांगत काही लोक बसेस आडवण्यावर ठाम होते. ते आपापसात वेळही ठरवत होते. नाईलाजाने मला ‘तुम्ही बस आडवायचे बोलत आहात तर मग आजी, माजी लोकप्रतिनिधींना घेराव का घालू नये?’ ही भाषा वापरणे भाग पडले. ही चर्चा बराच वेळ चालली अन् पुन्हा निवळली.
शेवटी व्हायचे तेच झाले. रात्री तुरोरी येथे एस. टी. बस जाळल्याची घटना समोर आली. पाठोपाठ जिल्हाधिकारी साहेबांचा संचारबंदी आदेशही धडकला.
काही लोकांना मराठा आरक्षण आंदोलनात स्वारस्य नाही. पण या आंदोलनाचा रोष आपल्या नेत्याकडे वळू नये यासाठी काही लोक जाणीवपूर्वक सक्रिय आहेत. लोकांचा रोष लोकप्रतिनिधींकडून सार्वजनिक मालमत्ता जाळण्याकडे वळावा यासाठीही काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्नरत आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला गालबोट लागेल याचेही भान त्यांना नेत्यांच्या चमचेगीरीपुढे राहिलेले नाहीये.
तुरोरीची बस कोण जाळळी याचा सखोल तपास व्हावा. मराठा आरक्षणाची लढाई ही गरजवंत मराठ्यांची लढाई आहे. त्यात होणारी प्रस्थापित आणि सत्तेतल्यांच्या निकटवर्तीयांची लुडबुड तात्काळ थांबवावी. ही लढाई केवळ मनोज जरांगे-पाटलांच्या आदेशान्वये पुढे न्यावी.
तुरोरी येथील घटना कुणी घडवून आणली याचा तपास घेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. कारण, जरांगे पाटलांचा आणि उमरगा येथील मराठा आरक्षण आंदोलन समितीचा कसलाही आदेश नसताना ही घटना घडवली गेली असल्याने या घटनेचा आणि मराठ्यांचा काहीही संबंध नाही.
जय जिजाऊ, जय शिवराय!
✍🏻 लिखाण
सामाजिक कार्यकर्ते ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)