♦️शिवसेना प्रमुखांकडून शिवसैनिकांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मोर्गदर्शन व शक्तिप्रदर्शन अशी शिवसेना दसरा मेळाव्याची ओळख आहे. पूर्वी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा शिवसेनेच्या विभागणी नंतर दोन ठिकाणी होऊ लागला. त्याप्रमाणेच शिवसेना एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होऊ लागला. परंतु शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा मुंबईच्या आझाद मैदानात होणार आहे. त्यासाठी आझाद मैदानात सध्या भव्य असे व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे.

♦️आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीमुळे दसरा मेळाव्यास विशेष महत्वाचा आहे. शिवसेनेकडून यंदा भव्य शक्ती प्रदर्शन दसरा मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आझाद मैदानावर 50 हजार लोकांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षात कोणकोण प्रवेश करणार, एकनाथ शिंदे हे कोणते खुलासे करणार, काय आश्वासने देणार, विरोधकांवर कोणत्या शब्दात टीका करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. बीकेसीमधील एमएमआरडीए ग्राउंडमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होणार होता. पण वाहतुकीची मोठी समस्या उद्भवत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मेळावायचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आझाद मैदानात होणाऱ्या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.