
जामखेड प्रतिनिधी (दि. १६ नोव्हेंबर)
अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला अवघे दोन दिवस बाकी असतानाही, प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा न केल्यामुळे शहरात प्रचंड राजकीय खळबळ उडाली आहे. ‘कोणाची वर्णी लागणार आणि कोणाला डच्चू मिळणार,’ या प्रश्नाभोवती चर्चा आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
अवघे ४८ तास शिल्लक.. मोठ्या उलथापालथीची शक्यता!
आतापर्यंत केवळ तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपसह सर्व प्रमुख पक्षांनी अजूनही पत्ते उघडलेले नाहीत. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरू आहे. येत्या ४८ तासांत मोठ्या राजकीय उलथापालथी होणार असल्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. प्रमुख पक्षांनी गुप्तता पाळली असली तरी, अनेक इच्छुकांनी ‘बी प्लॅन’ तयार ठेवला आहे. सोमवारी (उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस) अर्ज दाखल करण्याचा मोठा विक्रम होण्याची शक्यता आहे.
युतीचे गणित बिघडले? राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा ‘स्वतंत्र’ नारा?
महायुती (भाजप) अथवा महाविकास आघाडी (राष्ट्रवादी-शरद पवार गट, काँग्रेस) यांची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. युतीची पहिली फेरी निष्फळ ठरल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) महाविकास आघाडी न करता स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. काँग्रेस तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक एकास एक न होता बहुरंगी होण्याची दाट शक्यता आहे.
नगराध्यक्षपदाची प्रतिष्ठा: राम शिंदे विरुद्ध रोहित पवार
जामखेड नगरपरिषदेसाठी १२ प्रभागातून २४ नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडायचा आहे. एकूण २५ जागांसाठी होणारी ही निवडणूक विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. प्रा. राम शिंदे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, “जो जनतेच्या मनात आहे तोच उमेदवार दिला जाणार, कोणाचीही शिफारस अथवा वशीलेबाजी चालणार नाही.” राजकीय पक्षांना ‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी’ या फॉर्मुल्याचा विचार करूनच उमेदवारी वाटप करावे लागणार आहे, अन्यथा पक्षाला मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
विकासाचे व्हिजन महत्त्वाचे
या निवडणुकीत जो उमेदवार शहराच्या विकासाचे व्हिजन जनतेला देईल, तोच उमेदवार जनतेच्या पसंतीस उतरेल. समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या शहराला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याची धमक असणाऱ्या नेतृत्वावरच जनता विश्वास ठेवणार, अशी जामखेड शहराची सद्यस्थिती आहे. कायम जनतेचे काम करणाऱ्यांना राजकीय पक्षांनी संधी न दिल्यास, जनता अशा पक्षांना धडा शिकवू शकते, असा स्पष्ट मूड शहरात दिसत आहे.
प्रतिनिधी नंदु परदेशी,
एनटीव्ही न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर.
