एकाच छताखाली विविध शासकीय सेवा; १४ लाभार्थ्यांना घरपट्ट्यांचे वाटप..!

नागपूर प्रतिनिधी | दि: १५ मार्च २०२६

नागपूर: राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक पातळीवर तत्काळ निवारण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान जय शिबिर अभियान टप्पा-१’ अंतर्गत गोंडखैरी येथे आयोजित शिबिरात शेकडो प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एकाच छताखाली सर्व शासकीय विभाग

गोंडखैरी येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी देवस्थानच्या सभागृहात हे शिबिर संपन्न झाले. आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विविध सरकारी विभागांचे स्टॉल्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते.

सहभागी झालेले प्रमुख विभाग:

  • महसूल व वनविभाग, भूमी अभिलेख, मुद्रांक विभाग.
  • संजय गांधी निराधार योजना, घरकुल विभाग.
  • ‘आपले सरकार’ सेवा केंद्र, आधार कार्ड केंद्र, महावितरण (वीजबिल विभाग).
  • एकात्मिक बालविकास, सामाजिक वनीकरण आणि जैविक शेती विभाग.

शेकडो प्रकरणांचा त्वरित निपटारा

शिबिरादरम्यान नागरिकांच्या अनेक प्रलंबित कामांना गती देण्यात आली:

  • घरपट्ट्यांचे वाटप: १४ लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते घरपट्ट्यांचे अधिकृत वाटप करण्यात आले.
  • महसूल कामे: फेरफार प्रकरणे, सातबारा दुरुस्ती, डिजिटल सातबारा व डिजिटल ८-अ वाटप.
  • योजनांचे लाभ: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निराधार योजनेच्या प्रमाणपत्रांचे वाटप.

मिशन हेल्थ: मोफत आरोग्य शिबिर

महसूल शिबिरासोबतच गोंडखैरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लता मंगेशकर रुग्णालयाच्या ‘मिशन हेल्थ’ अंतर्गत आरोग्य संजीवनी उपक्रम राबवण्यात आला. डॉ. अनुज तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांनी कॅन्सर, हृदयरोग, सांधे प्रत्यारोपण व मूत्ररोग तपासणीसह विविध वैद्यकीय सेवा मोफत दिल्या. तालुक्यात अशाच प्रकारचे आरोग्य शिबिरे पुढेही राबवण्यात येतील, असे आश्वासन आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी दिले.

उपस्थित मान्यवर व अधिकारी

या कार्यक्रमास तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सरपंच वर्षा अतकरी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार विकास बिक्कड, नायब तहसीलदार ज्योती जाधव, संजय कांबळे आणि गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


वृत्त संकलन: मंगेश उराडे, एनटीव्ही न्यूज मराठी, नागपूर जिल्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *