स्वतःवर गोळी झाडल्याचा प्राथमिक संशय; घरात पिस्तूल आणि मद्य सापडल्याने खळबळ..!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | दिनांक: ५ एप्रिल २०२६
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील एन-६ सिडको परिसरातील साईनगर येथे एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. एका ३१ वर्षीय तरुणाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे.
रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुण
मिळालेल्या माहितीनुसार, समीर नाईक (वय ३१) असे या गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. समीर हा पेशाने पौरोहित्याचे काम करतो. रविवारी ही घटना घडली तेव्हा समीरची आई बांगड्यांच्या दुकानात गेली होती आणि समीर घरी एकटाच होता. काही वेळाने समीरचा लहान भाऊ घरी परतला असता, त्याला समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.
घटनास्थळी पिस्तूल आणि मद्यसाठा
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. समीरच्या शेजारीच एक पिस्तूल आढळून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या खोलीत हा प्रकार घडला, तिथे पोलिसांना दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि भांगेच्या गोळ्याही सापडल्या आहेत. गोळी कानाजवळून डोक्याच्या आरपार गेल्याने समीरची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घातपात की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरू
समीरने हे टोकाचे पाऊल का उचलले, की यामागे काही वेगळे कारण आहे? तसेच, त्याच्याकडे हे पिस्तूल कुठून आले? या सर्व बाबींचा तपास सिडको पोलीस करत आहेत. भरवस्तीत घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे साईनगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वृत्त संकलन: प्रतिनिधी रमेश नेटके, छत्रपती संभाजीनगर.
