जळगाव जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांवर होणारा प्रशासकीय अन्याय, नियमांची पायमल्ली आणि प्रलंबित मागण्यांविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आक्रमक झाली आहे. उप प्रदेशाध्यक्ष रामदास भाईदास पावरा यांच्या नेतृत्वाखाली यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्रशासनाला २१ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. विहित मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास यावल प्रकल्प कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला कुलूप ठोकून ताळेबंद आंदोलन छेडण्याचा इशारा रामदास पावरा यांनी दिला आहे. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यामध्ये पेसा ५० टक्के रोस्टर आणि १७ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावल प्रकल्पांतर्गत शासकीय कार्यालये, आश्रमशाळा आणि जिल्हा परिषद शाळांमधील १७ संवर्गातील मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांचा अहवाल जाहीर करावा, तसेच पेसा व बिगर-पेसा कर्मचाऱ्यांची नावानिशी यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी आहे.
५ वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत बिगर-पेसा कर्मचाऱ्यांना नियमानुसार बिगर-पेसा क्षेत्रात पाठवून स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी पदे उपलब्ध करून द्यावीत, तसेच कंत्राटी व बाह्यस्रोत भरतीमध्ये स्थानिक पेसा उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
भालोद येथील आदिवासी वस्तीची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता, पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशीही मागणी आहे.
याशिवाय ५ टक्के पेसा निधीतून आदिवासी क्रांतिकारकांचे पुतळे उभारणे, ५ ऑगस्ट २०२६ चा जी.आर. रद्द करणे, आश्रमशाळांमधील सेंट्रल किचन पद्धत बंद करून ताजा आहार देणे, वसतिगृह विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता वाढवणे, स्वतंत्र बस सेवा सुरू करणे, प्रत्येक PHC मध्ये २४ तास निवासी डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध करणे, प्रलंबित वनहक्क दावे मंजूर करणे आणि सत्रासेन (किसनपाडा) येथे पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावल वाईल्डलाईफ सँक्चुरीमुळे होणारे विस्थापन रोखण्यासाठी संबंधित मंजुरी रद्द करावी, तसेच २९ ऑगस्ट २०२६ रोजी उप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने खोटी तक्रार करून बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या आंदोलनाला आसम परिवार, भीम आर्मी, स्टार संघटना, तडवी भिल्ल विवाह युवा कृती समिती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), आदिवासी सेल काँग्रेस समिती आणि बिरसा महामानव संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष मुराद तडवी, रोनक तडवी, राजू दादा तडवी, रमोद पाडवी, सचिन पावरा, प्रवीण पावरा, जयदास पावरा, समाधान पावरा, सलीम छबु कुसुंबा, नसीर इब्राहिम लोहारा, सरफराज एकबार, फिरोज अब्बास सांगवी, सरदार बलदार हंबर्डे, सलीम सुभान पाल, राजू अकबर करजोत, नबाब दादा पिपरी, जहांगीर अहिरवाडी, जाबीर कबीर चिचाटे, फकीरा दादा नायगाव, नूर मोहम्मद इब्राहिम मोहगन, भिकारी दादा युवरा, नासिर दादा भाटकेळा, बबीता तडवी भटकेळा, जुबेदा बाई आमदा, आजराबाई आमदा तसेच भालोद महिला मंडळ गटाच्या महिला आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
