जन्म-मृत्यू विभागाच्या सेवांबाबत नागरिकांचे मत

उमरखेड़ : शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय सेवांच्या गुणवत्तेबाबत तुलना केली असता उमरखेड नगरपरिषद जन्म-मृत्यू विभागाने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे समोर आले आहे. नागरिकांना येथे जलद, पारदर्शक आणि समाधानकारक सेवा मिळत असल्यामुळे या विभागाचे विशेष कौतुक होत आहे.
उमरखेड नगरपरिषदेत जन्म व मृत्यू नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना कमी वेळेत आवश्यक प्रमाणपत्रे मिळत आहेत. कार्यालयातील कर्मचारी विनम्र व सहकार्यशील असल्याने नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत नाही. तसेच कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ व स्पष्ट असल्यामुळे कामे वेळेत पूर्ण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
याउलट, जिल्ह्यातील अनेक नगर परिषद जन्म-मृत्यू विभागाबाबत काही नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. व कामकाजात विलंब, अपुरी माहिती व नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात, अशा तक्रारी समोर येत आहेत.
इमारतीच्या बाबतीतही उमरखेड नगरपरिषद आघाडीवर असल्याचे दिसून येते. प्रशस्त, स्वच्छ आणि सुस्थितीत असलेली इमारत नागरिकांसाठी अधिक सोयीची ठरत आहे. यामुळे नागरिकांना सेवा घेताना सकारात्मक अनुभव येत आहे.
दरम्यान, दुसऱ्या नगर परिषद प्रशासनाने उमरखेडच्या धर्तीवर सेवा सुधारणा करण्याची गरज व्यक्त होत असून, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.


[ उमरखेड़ नगर परिषद चे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जन्म मृत्यू विभागातील वरिष्ठ लिपिक व कर्मचारी उत्कृष्ट सेवा देत असल्याचे दिसून येते हे विशेष]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *