- जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ८९५ व्या जयंतीनिमित्त फुलवळ येथे जय्यत तयारी.
- श्रीकांत मंगनाळे अध्यक्ष तर गोविंद मंगनाळे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- १५ मे रोजी सद्गुरु बसया स्वामी मठ संस्थान येथून निघणार भव्य शोभायात्रा.
- सर्वधर्मीय नागरिकांना जयंती उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन.
NANDED | कंधार तालुक्यातील फुलवळ येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ८९५ व्या जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जयंती उत्सवासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
येथील जुने गावठाण सार्वजनिक सभागृह येथे पार पडलेल्या या बैठकीमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवाची रूपरेषा ठरवण्यात आली. या जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी श्रीकांत मंगनाळे, उपाध्यक्षपदी गोविंद मंगनाळे, सचिवपदी विठ्ठल मंगनाळे तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून शुभम फसमले आणि मारुती फुलवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीला ग्रामपंचायतीचे सदस्य प्रवीण मंगनाळे, सामाजिक कार्यकर्ते केदार फूलवळे, विठ्ठल मंगनाळे, सतीश मंगनाळे, अक्षय मंगनाळे, अनिल मंगनाळे, उमाकांत मंगनाळे यांच्यासह गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यंदाची जयंती अत्यंत आनंदाच्या वातावरणात साजरी करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या नियोजनानुसार, १५ मे रोजी शुक्रवार सायंकाळी ४ वाजता सद्गुरु बसया स्वामी मठ संस्थान, फुलवळ जुने गावठाण येथून जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या उत्सवात गावातील सर्व धर्मातील लोकांनी सहभागी होऊन जयंतीची शोभा वाढवावी, असे आवाहन नवनिर्वाचित कार्यकारिणी आणि समाजबांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
शेख शादुल, कंधार.
