०४ आरोपी ताब्यात; ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव | प्रतिनिधी आयुब शेख
धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र व दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. १० जुलै २०२६ रोजी तुळजापूर येथील मंदिर परिसरात भाविक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इप्परवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे वाशी टोलनाका परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी तुळजापूर व येरमाळा परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मणीमंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीसांनी आरोपींकडून सुमारे २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चोरीसाठी वापरलेली होंडा स्कुटी असा एकूण ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे तुळजापूर पोलीस ठाण्यातील १ व येरमाळा पोलीस ठाण्यातील ३ असे एकूण ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनिता सुनील शिंदे, हिराबाई रमेश शिंदे, चिंगीबाई रमेश शिंदे व किरण शेवराज शिंदे (सर्व रा. पिंपळगाव तांडा, ता. अंबड, जि. जालना) यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इप्परवार, सपोनि सुदर्शन कसार, पोहेकॉ शेखकत पठाण, पोहेकॉ जावेद काझी, पोहेकॉ फरहान पठाण, मपोहेकॉ शोभा बागर व चालक रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
