उमरखेड :
महाराष्ट्र राज्यासह जिल्ह्यात सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून अनेक नागरिक आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोटींग पोर्टल (NCCR Portal) च्या माध्यमातून उमरखेड पोलिसांनी एका तक्रारदाराची संपूर्ण ७२ हजार रुपयांची रक्कम परत मिळवून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार,
रवि पुरुषोत्तम चौधरी रा उमरखेड यांची दि ०४ मे २०२५ रोजी ऑनलाईन माध्यमातून ७२,००० रुपयांची फसवणूक झाली होती. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन उमरखेड येथे धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोटींग पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल केली असता Akn. No. 31905250072958 प्राप्त झाला.
पोलीस अधीक्षक कुमारचिंता , उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ व सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक मुनेश्वर मॅडम यांच्या संयुक्त नेतृत्वात ही कार्यवाही करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस स्टेशन उमरखेड येथील पोलीस शिपाई विष्णु राठोड तसेच सायबर सेल यवतमाळ येथील पोलीस शिपाई अविनाश शहारे यांनी तांत्रिक तपास, बँक व्यवहारांची पडताळणी व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून फसवणूक झालेली संपूर्ण ७२ हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराला परत मिळवून दिली.
रक्कम परत मिळाल्यानंतर तक्रारदार रवि चौधरी यांनी पोलीस स्टेशन उमरखेड येथे उपस्थित राहून पोलिसांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या तत्पर कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांनी पोलीस शिपाई विष्णु राठोड यांच्या उत्कृष्ट कार्याचे विशेष कौतुक केले.
याबाबत अधिक माहिती घेतली असता पोलीस शिपाई विष्णु राठोड यांनी सांगितले की, सन २०२५ मध्ये ऑनलाईन फ्रॉड झालेल्या प्रकरणांपैकी ३० हजार ६२५ रुपये तर सन २०२६ मध्ये आतापर्यंत तब्बल ६,३८,६०९ रुपये विविध तक्रारदारांना परत मिळवून देण्यात यश आले आहे.
सायबर गुन्ह्यांविरोधात उमरखेड पोलिसांनी केलेली ही कार्यवाही नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी असून, ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोर्टलवर किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
