राहुरी फॅक्टरी ते कोल्हार रोडवर दरोडा आणि डिझेल चोरीच्या तयारीत असलेल्या चौघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. टोळीकडून स्विफ्ट कार, मोबाईल, डिझेल, हत्यारे असा 2 लाख 15 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राहुरी/अहिल्यानगर: दरोडा आणि डिझेल चोरीच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने पकडून मोठा अनर्थ टाळला आहे. 18 मे 2026 रोजी रात्री राहुरी फॅक्टरी परिसरात ही कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि संदीप मुरकुटे, भगवान थोरात, रमीजराजा आत्तार, प्रकाश मांडगे, विशाल तनपुरे, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक पाहिजे आणि फरार आरोपींच्या शोधासाठी गस्त घालत होते.

रात्री पेट्रोलिंगदरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कोल्हार-राहुरी रोडवर एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पदरित्या फिरत आहे. या कारमधील इसम डिझेल चोरी करून दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत.

माहितीच्या आधारे पथकाने राहुरी फॅक्टरी ते कोल्हार रोडवर पेट्रोलिंग सुरू केली. गुहा गाव परिसरात संशयित कार कोल्हारकडून राहुरीच्या दिशेने येताना दिसली. पोलिसांनी गाडी अडवून त्यातील तिघांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी आपली नावे 1) करण राजू उर्फ राजेंद्र साळुंके वय 22 वर्षे रा. नांदुर्खी रोड, शिर्डी, 2) सनी उर्फ सल्ल्या राजेंद्र पवार वय 19 वर्षे रा. सावळीविहीर ता. राहाता, 3) जितेंद्र रोहिदास वाघमारे वय 33 वर्षे रा. पिंपळस ता. राहाता अशी सांगितली.

पळून गेलेल्या चौथ्या साथीदाराचे नाव निलेश मोकळ रा. सावळीविहीर ता. राहाता असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोपींच्या अंगझडतीत आणि ताब्यातून 11 हजार रुपयांचे दोन मोबाईल, 2 लाख रुपयांची स्विफ्ट कार, 3250 रुपयांचे 35 लिटर डिझेल, 800 रुपयांचे 4 मोकळे ड्रम, 370 रुपयांची टॉर्च, लोखंडी कटावणी, चाकू आणि प्लास्टिक पाईप असा एकूण 2 लाख 15 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यातील तिघांना मुद्देमालासह राहुरी पोलीस ठाण्यात हजर करून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(4), 310(5) प्रमाणे दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. फरार आरोपी निलेश मोकळचा शोध सुरू आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *