प्रतिनिधी : आयुब शेख | धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने तत्पर कारवाई करत अवघ्या २४ तासांच्या आत ट्रकमधून चोरीस गेलेले सुमारे ३ लाख १९ हजार रुपये किंमतीचे मेंढे जप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे पशुधन चोरीच्या घटनांवर आळा घालण्यास मदत झाली आहे.

दिनांक २३ मे २०२६ रोजी पहाटे येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी मेंढे चोरी करून नेल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक ऋतु खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जापवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तातडीने तपास सुरू केला.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ठिकाणी कारवाई करत चोरीस गेलेले मेंढे जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३ लाख १९ हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई येरमाळा पोलीस ठाण्यात सुरू आहे.

या यशस्वी कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, येरमाळा पोलीस ठाणे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान राहिले.

पोलीस प्रशासनाच्या या तत्पर व प्रभावी कारवाईचे नागरिकांकडून स्वागत व कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *