महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे तुळजापूर आता अद्ययावत २३३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असणार आहे. मंदिर परिसरासह शहरातील मुख्य भागात हे कॅमेरे लावण्यात आले असून, भाविकांची सुरक्षा आणि गर्दीवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.
तुळजापूर शहरातील प्रवेशद्वारे, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील अशा ६२ ठिकाणी २३३ विविध प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. गुन्हेगारांवरही या कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.
नियंत्रण कक्षातून नागरिकांना सूचना देण्यासाठी ३० ठिकाणी स्पीकर, तर आपत्कालीन परिस्थितीत धोक्याची सूचना देण्यासाठी १५ ठिकाणी अलार्म सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे.
१० कोटी रुपये खर्च करून ही सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. देशभरातून तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हे सुरक्षिततेचे कवच ठरणार आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले असून, तुळजापूर पोलिस ठाण्यातून या यंत्रणेचे ऑपरेटिंग करण्यात येणार आहे.
