भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत तसेच ‘शेतीमधील नवीन तंत्रज्ञान व हवामान अंदाज’ या व्हॉट्सॲप समूहाच्या १२व्या वर्धापनदिनानिमित्त भोयेगाव येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मातोश्री बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या या मेळाव्याला शेतकरी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बदलते हवामान, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि पिकांच्या उत्पादनातील आव्हाने लक्षात घेता शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून योग्य वापर करावा, या उद्देशाने हवामान अंदाज तज्ज्ञ दीपक जाधव यांनी मार्गदर्शन केले. हवामान अंदाज, पिकांचे नियोजन आणि बदलत्या हवामानानुसार शेती व्यवस्थापनाबाबत त्यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाला चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुलदादा आहेर, प्रा. संदीप जगताप, विजय पवार, डॉ. हिरालाल पवार, गणेश निंबाळकर, नितीन आहेर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा शाल, गुलाबाचे पुष्प आणि कॅप देऊन सत्कार करण्यात आला.

शेतकरी मेळाव्यासोबतच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये तब्बल २०० नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. संकलित रक्त मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आडगाव येथील रक्तपेढीकडे जमा करण्यात आले.

गेल्या १२ वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती आणि हवामान अंदाज उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद शेतकऱ्यांचा आधुनिक तंत्रज्ञान आणि हवामानाधारित शेतीकडे वाढता कल दर्शवणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *